पुणे: कोरोनानंतर मुलांच्या अध्ययन क्षमतेवर झालेला परिणाम, लिखाणाचा कमी झालेला वेग आणि राज्यात राबविलेले कॉपीमुक्त अभियान या कारणांमुळे मार्च २०२० च्या निकालाच्या तुलनेत यंदाचा निकाल १.४८ टक्क्याने कमी लागला असल्याचे राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले. गतवर्षी मार्च २०२२ चा निकाल ९६.९४ टक्के इतका होता. मार्च २०२३ चा निकाल ९३.८३ टक्के आहे. त्यामुळे मार्च- एप्रिल २०२२ च्या तुलनेत या वर्षीचा निकाल ३.११ टक्के कमी आहे. मार्च २०२० च्या निकालाची तुलना करता मार्च २०२३ चा निकाल १.४७ टक्के कमी आहे. दोन वर्षे कोरोनाचा प्रभाव होता. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययन क्षमतेवर परिणाम झाल्याचे दिसले. शिवाय ७५ टक्के अभ्यासक्रमावर आधारित परीक्षा होती, त्यामुळे लिखाणाचा वेग कमी झाला. कॉपीमुक्त अभियान ते मोठ्या प्रमाणावर राबविण्यात आले. ११६ कॉपी करणारे विद्यार्थी पकडण्यात आले. शिक्षकांनी साहाय्य केलेले 2 , अन्य प्रकार २४८ असे मिळून ३६६ गैरप्रकार रोखण्यात आले. त्याचा परिणामही निकालावर झाला असल्याचे गोसावी यांनी नमूद केले.
SSC Result 2023: लिखाणाचा वेग कमी, कॉपीमुक्त अभियान; यंदा दहावी निकालात घसरण
By नम्रता फडणीस | Published: June 02, 2023 12:25 PM