पुणे: शहरातील पुण्येश्वर व नारायणेश्वर ही पुरातन मंदिरे पाडून तिथे छोटा व बडा शेख सल्ला अशी प्रार्थनास्थळे उभी करण्यात आली. महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता ही मंदिरे पुन्हा अस्तित्त्वात यावीत यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे मनसेचे प्रदेश सरचिटणीस अजय शिंदे यांनी सांगितले. रविवारी झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेतील भाषणात शिंदे यांनी जाहीरपणे याविषयी वक्तव्य केले.
शिंदे म्हणाले, जुन्या पुणे शहरातील ही मुख्य देवालये होती. त्यात रास्ता पेठेतील नागेश्वर मंदिराचाही समावेश आहे. आक्रमकांनी पुणे शहर ताब्यात घेतले त्यावेळी पुण्येश्वर व नारायणेश्वर ही दोन्ही देवालये पाडली व तिथे अन्य प्रार्थनास्थळे बांधली. त्यालाच आता छोटा शेख सल्ला व बडा शेख सल्ला असे म्हटले जाते. त्यावेळी आक्रमकांकडून नागेश्वर मंदिर मात्र वाचले.
इतिहास संशोधक, पुरातत्व अभ्यासक यांनी या जागांचा अभ्यास करून त्याठिकाणी मंदिर असल्याचे मत व्यक्त केले असल्याचा दावा शिंदे यांनी केला. शहरातीलच अन्य काही संघटनांनी यासंदर्भात न्यायालयात दावा दाखल केला, त्यांच्या म्हणण्याच्या विरोधात अन्य काही संघटनांनीही प्रतिदावा न्यायालयात सादर केला आहे अशी माहिती शिंदे यांनी दिली. मनसेच्या माध्यमातून आपण फार पुर्वीपासून हा विषय हाताळतो आहे असे ते म्हणाले.दरम्यान तिथे मंदिरे असल्याबाबतचे पुरावेही असल्याचे शिंदे यांनी सांगितले. काही हिंदू संघटनांच्या प्रतिनिधींनी या ठिकाणी आरती करण्याचा प्रयत्नही केला होता. त्यावरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आताही शिंदे यांनी रविवारीच्या भाषणात यासंबधी जाहीर वक्तव्य केल्यानंतर पोलिसांनी आता दोन्ही प्रार्थनास्थळांभोवती बंदोबस्त जारी केला आहे.