मंचर: आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर या चार तालुक्यांसाठी अवसरी खुर्द येथील शासकीय तंत्रनिकेतनमध्ये २४.२४ कोटींचे २८८ बेडचे जंबो काेविड सेंटर उभारण्यात येणार आहे. या निर्णयाचे स्वागतच आहे. पण, या जंबो कोविड सेंटरमुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक झळ सोसावी लागणार आहे. या चारही तालुक्यांसाठी प्रत्येकी १२ आयसीयू बेड, ७५ ऑक्सिजन बेडचे छोटेखानी जंबो कोविड सेंटर उभारण्यात यावे अशी मागणी शिवसेना उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांनी केली आहे. तसेच, पत्रही त्यांनी विभागीय आयुक्त सौरव राव व जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना दिले आहे.
आढळराव पाटील म्हणाले की, भौगोलिकदृष्ट्या तालुकानिहाय विचार केला असता खेड तालुका औद्योगिक नगरी म्हणून प्रसिध्द आहे. येथील चाकण, आळंदी नगर परिषदांसह आसपासच्या गावातील लोक चाकणहून अवसरीतील जंबो काेविड सेंटरला भरती होण्यापेक्षा जवळच असलेल्या भोसरी, पुणे आदी भागातील दवाखान्यामध्ये भरती होणे पसंत करतील. अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक कोरोनाबाधित रुग्णाला सरासरी किमान एक लाख रुपये खर्च येऊन खूप मोठा आर्थिक भुर्दंड भोगायला लागेल.
खेड तालुक्यातील ८० टक्के लोक अवसरीपेक्षा पुण्याला जाऊन उपचार घेणे पसंत करतील, ही वस्तुस्थिती असून याची आपण खबरदारी घेणे गरजेचे आहे. शिरूर तालुका विस्ताराने खूप मोठा असून येथील नगर जिल्ह्याला लागून असलेली तांदळी, मांडवगण फराटा, इनामगाव, शिरसगाव फाटा यासारखी अनेक गावे अवसरीपासून सुमारे ९० ते १०० किमी अंतरावर असून हे अंतर पार करून अत्यवस्थ कोरोना रुग्णांना येथे भरती करणे अतिशय कठीण आहे.
जुन्नर व खेडच्या दुर्गम आदिवासी भागातही मोठ्या प्रमाणात वैद्यकीय सुविधांची वाणवा आहे. या भागांतून सुमारे ६०-७० किमीचा प्रवास करून रुग्ण अवसरी सेंटरला आणणे अतिशय जिकरीचे काम आहे. जुन्नर, खेड व शिरूर या तीनही तालक्यांना या सेंटरचा फारसा उपयोग होणार नाही. त्यामुळे या रु. २४.२४ कोटी निधीचा योग्य वापर करावयाचा झाल्यास चारही तालुक्यांसाठी प्रत्येकी ७५ ऑक्सिजन बेड (त्यापैकी १२ आयसीयू बेड) असेलले स्वतंत्र छोटेखानी जंबो कोविड सेंटर उभारल्यास त्याचा त्या त्या तालुक्यातील लोकांना अधिकच फायदा होऊन रुग्णाला रुग्णालयात दाखल करण्यासाठी लागणाऱ्या वेळेत मोठी बचत होईल. वेळेवर उपचार मिळाल्यास गंभीर रुग्णांचा जीव वाचण्यास मदत होऊ शकेल. मोठ्या जंबो सेंटरपेक्षा छोट्या जंबो सेंटरची उपयुक्तता व कार्यक्षमता अधिक असल्याचे वेळोवेळी दिसून आल्याचे आढळराव पाटील यांनी पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे.