लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे: दुसऱ्या अंशतः टाळेबंदीने सर्वसामान्य कष्टकरी वर्गाबरोबरच व्यापारीवर्गही पुरता आर्थिकदृष्ट्या कोलमडला आहे.
त्यांच्या घरातल्या महिलांनाही आता कुटुंबाचा खर्च भागवायचा कसा, असा प्रश्न पडला आहे.
पेठांमधील बहुतांश दुकाने बंदच आहेत. त्यामुळे लहान व्यापाऱ्यांचे रोजचे उत्पन्न थांबले आहे. गुढीपाडवा सणासारखा हमखास व्यवसाय होणारा हंगामही हातातून गेल्याने आता नेमके करायचे तरी काय, यातून सुटका होणार तरी कशी, असा प्रश्न त्यांच्याबरोबरच त्यांच्या घरातल्यांनाही पडला आहे. महिन्याला घरखर्चाला लागणारे पैसे लागतातच, ते कुठून आणायचे अशी चिंता त्यांंना भेडसावत आहे.
अगरबत्ती, स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने, कपडे, लहान मुलांची खेळणी, भांडी, गृहोपयोगी वस्तू अशी अनेक दुकाने व्यापारी पेठांमध्ये तसेच आता नव्यानेच विकसित झालेल्या उपनगरांमध्ये आहेत. काही लहानमोठी दुकाने व्यापाऱ्यांबरोबरच त्यांच्या पत्नीही सांभाळतात. त्यांना प्रामुख्याने टाळेबंदीचा फटका जास्त जाणवतो आहे. फक्त घरीच असणाऱ्या महिलांंनाही मासिक घरखर्चाची तोंडमिळवणी करणे अवघड होत चालले आहे.
किराणा माल, बेकरी, औषधे अशी काही मोजकीच दुकाने वगळता अन्य सर्व दुकाने कोरोना टाळेबंदीत सरकारने बंदच ठेवली आहेत. रोज मिळणारे पैसे, त्याची मासिक साठवण, त्यामधून कामगारांचा पगार, दुकानाचे लाइटबिल वगैरेसारखे बांधील खर्च, नव्या मालाची खरेदी व नंतर घरखर्चासाठी ठराविक रक्कम, उर्वरित शिल्लक, कर्ज असेल तर त्यातून कर्जाचे हप्ते अशा प्रकारे बहुसंख्य व्यापाऱ्यांचे गणित असते. टाळेबंदीने ते पूर्ण मोडीत निघाले आहे. --//
आमचे अगरबत्तीचे दुकान आहे. मीपण पतीला कामात हातभार लावते. दुकान बंद झाल्याने रोजचे ऊत्पन्न नाही. शिल्लक रकमेतून घरची रोजची खरेदी होते. ते पैसेही आता खर्च होत चालले आहेत.
पवन संजय ओझा
लक्ष्मी सुगंधालय, रास्ता पेठ
----//
व्यापाऱ्यांकडे फार पैसा असतो असा उगीचच समज आहे. व्यवसायात खर्च फार उत्पन्न कमी असे असते. आता तर दुकान बंदच असल्याने उत्पन्न बंद व खर्च सुरू असा प्रकार आहे. बँकेतील ठेवी मोडून घर चालवण्याची वेळ आली आहे.
सराफ व्यावसायिकाची पत्नी
सराफ बाजार.
------//
आमचे स्टेशनरीचे दुकान आहे. भाडेतत्त्वावर घेतलेले दुकान मागील टाळेबंदीत भाडे देता न आल्याने परत करावे लागले. आता घरातच थोडी जागा करून त्याच मालावर दुकान सुरू केले, तर आता तेही बंद करावे लागले. दुकानदार म्हणून आम्हाला कोणी मदतही करायला तयार नसते.
संगीता परदेशी- स्टेशनरी. गुरूवार पेठ