पुणे : प्रजासत्ताक दिनाचा मुहूर्त चुकवलेली स्मार्ट सिटीची घोषणा केंद्र सरकारकडून उद्या (गुरुवार) होणार असून, त्यात पुण्याचा समावेश असणार की नाही, याकडे प्रशासन, पदाधिकारी, तसेच या योजनेत मोठ्या संख्येने सहभागी करून घेण्यात आलेल्या नागरिकांचेही लक्ष लागले आहे. सलग ६ महिने आयुक्तांसह सर्व प्रशासन या योजनेसाठी पुण्याची तयारी करून घेण्यात गुंतले होते.केंद्र सरकारच्या या योजनेने पुण्यात बरेच मोठे राजकीय वादळ निर्माण झाले. पालिकेतील सत्ता राष्ट्रवादी व काँग्रेसची व ही योजना मात्र केंद्रातील भाजपा सरकारची, असे असल्यामुळे यात आयुक्त कुणाल कुमार यांना बरीच तारेवरची कसरत करावी लागली. सलग १४ तासांच्या चर्चेनंतर सत्ताधारी राष्ट्रवादी व काँग्रेसने योजनेबाबत एक महिन्यानंतर निर्र्णय घेऊ, असे ठरवून प्रशासनाची अडचण केली. आयुक्तांनी त्यावर थेट सरकारकडून विशेष सभा घेण्याचा निर्णय आणला. त्यानंतर प्रस्ताव केंद्राकडे पाठवण्यात आला, मात्र त्याला अनेक उपसूचना जोडण्यात आल्या आहेत. त्यातही केंद्र सरकारने योजनेच्या अंमलबजावणीसाठी स्वतंत्र कंपनी स्थापन करण्याबाबत केलेल्या तरतुदीला तर स्पष्ट विरोध केला आहे. त्यामुळे उद्या दिल्लीत जाहीर होणार असलेल्या या योजनेत पुण्याचा समावेश होतो किंवा नाही याबाबत सर्व थरात उत्सुकता आहे. (प्रतिनिधी) पुण्याचे काय होणार? : प्रशासन, पदाधिकारी, नागरिकांमध्येही उत्सुकता
दिल्लीत आज स्मार्ट सिटीची घोषणा
By admin | Published: January 28, 2016 3:11 AM