पुणे : पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन कंपनीच्या संचालक मंडळाच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत अॅडॉप्टिंग ट्रॅफिक सिग्नलवर चर्चा झाली. अध्यक्ष नसल्यामुळे थोडक्यात माहिती घेऊन पुढील बैठक १० ते १७ जूनच्या दरम्यान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीचे अध्यक्ष असलेले नगरविकास विभागाचे प्रधान सचिव नितीन करीर परगावी गेले होते. त्यामुळे पदसिद्ध संचालक असलेल्या महापालिका पदाधिकाऱ्यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत बसवण्यात येणाऱ्या अत्याधुनिक सिग्नलची माहिती घेतली.या नव्या पद्धतीच्या सिग्नलमध्ये एका एलईडी स्क्रिनवर पुढील चौकात वाहतुकीची काय स्थिती आहे, ते वाहनचालकांना दिसणार आहे. तो चौक वाहतुकीस मोकळा झाल्यानंतरच अलीकडच्या वाहनचालकांना सिग्नल मिळेल, अशी रचना त्यात आहे. या कामाच्या निविदेबाबतही बैठकीत चर्चा झाली असल्याचे समजतेदरम्यान, राज्य सरकारने कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या डॉ. अमित सैनी या भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्याची त्यांनी कार्यभार घेण्याआधीच बदली करण्यात आली आहे. त्यांना पुण्यात येण्याआधीच दुसरीकडे पाठवण्यात आले आहे. त्यांना मुंबई येथे विक्रीकर खात्याचे सहायक आयुक्त म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे. सध्या कंपनीतील या महत्त्वाच्या पदाचा कार्यभार महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांच्याकडे आहे, मात्र त्या गेल्या तीन महिन्यांपासून रजेवर असल्यामुळे महापालिका आयुक्त कुणाल कुमार हेच या पदाचे अतिरिक्त काम पहात आहेत.
‘स्मार्ट सिटी’ बैठक आटोपती
By admin | Published: May 13, 2017 4:53 AM