पुणे - केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी मिशन’ कार्यक्रमांतर्गत शहरात २२५७ कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात साडेतीन वर्षांमध्ये जेमतेम १३५ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. स्मार्ट सिटी मिशन स्पर्धेत द्वितीय स्थानी असलेल्या पुण्यामध्ये स्मार्ट सिटीच्या कामांची गती मात्र मंदावल्याचे चित्र आहे.केंद्र शासनाने स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत देशभरातील १०० शहरांची स्पर्धा घेऊन निवड करण्यात आली. प्रथम वर्षी भुवनेश्वर पाठोपाठ पुणे द्वितीय क्रमांकाचे शहर ठरले होते. शहराला केंद्राकडून पहिल्या वर्षी २०० कोटी आणि नंतरच्या तीन वर्षांमध्ये प्रत्येकी १०० कोटी रुपये विशेष निधी देण्याची घोषणा झाली होती. राज्य शासन आणि महापालिकाही तेवढीच रक्कम देणार अशीही घोषणा करण्यात आलेली होती.पुणे शहरात पहिल्या टप्प्यात विविध प्रकारच्या ५२ प्रकल्पांची निवड करून त्याचे काम सुरू करण्यात आले. औंध-बाणेर-बालेवाडी या परिसराची निवड ‘एरिया डेव्हलपमेंट’अंतर्गत करण्यात आली. पहिल्याच वर्षी पुणे स्मार्ट सिटी कंपनीला १९५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. मात्र, अडीच वर्षांमध्ये केवळ १३५ कोटी रुपयांचाच निधी खर्च झाला आहे. उर्वरित निधी जोपर्यंत खर्च होणार नाही, तोपर्यंत पुढील निधी देता येणार नसल्याचे स्मार्ट सिटीला केंद्र शासनाने कळविले आहे.पुणे स्मार्ट सिटी कंपनीने आतापर्यंत केवळ १८ प्रकल्पांसाठी केवळ ५३१ कोटी १५ लाख रुपयांच्या निविदा काढल्या आहेत. तसेच, ४३१ कोटी ३५ लाख रुपयांच्या कामांच्या वर्क आॅर्डर दिल्या आहेत. तर या वर्क आॅर्डरपैकी आतापर्यंत केवळ १३५ कोटी रुपयेच खर्च झाल्याचे चित्र आहे.स्मार्ट सिटी कंपनीकडून औंधमध्ये दोन रस्ते आणि पदपथ, एरिया डेव्हलपमेंट अंतर्गत दोन उद्याने तयार करण्यात आली आहेत.पूर्ण शहरात शासकीय संदेश देणाऱ्या व्हिडीएमडी (डिजिटल बोर्ड) आणि सार्वजनिक ठिकाणी वाङमय सुविधा उपलब्ध करून दिली आहे. प्रायोगिक तत्त्वावर योजनेसाठी यंत्रणाही उभारली जात आहे.
स्मार्ट सिटी मिशनची गती मंदावली, अवघा १३५ कोटींचा खर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 1:38 AM