राजू इनामदार, पुणेपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी या महत्त्वाकांक्षी योजनेच्या विरोधकांची थेट केंद्र सरकारच्या इंटलेजिन्स ब्युरोच्या (आयबी) प्रदेश शाखेकडून (एसआयबी) चौकशी करण्यात येत आहे. विरोध का व कशासाठी, हे समजून घेण्याबरोबरच विरोधकांच्या राजकीय, तसेच सामाजिक पार्श्वभूमीचीही माहिती यात घेतली जात आहे. ही एकप्रकारची अघोषित आणीबाणीच असून, लोकशाहीने दिलेल्या हक्काला बाधा आणण्याचाच प्रकार असल्याचे यामुळे बोलले जात आहे.काँग्रेसचे कार्यकर्ते अॅड. रमेश धर्मावत यांची या शाखेच्या एका महिला अधिकाऱ्याने अशी चौकशी केली. पीपल्स युनियन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून धर्मावत यांनी स्मार्ट सिटीच्या विरोधात संघटन उभे केले असून, चळवळही सुरू केली आहे. त्याअंतर्गत त्यांनी नुकतीच एक पुस्तिका प्रकाशित केली. त्यात ज्या देशांच्या प्रभावावरून स्मार्ट सिटी योजना राबविली जात आहे, त्या देशांमधील स्थानिक स्वराज्य संस्था कशा कर्जबाजारी झाल्या, करांमध्ये प्रचंड वाढ झाल्यामुळे त्या शहरांमधील नागरिक कसे शहर सोडून अन्य शहरांमध्ये गेले, त्याची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर पुणेकरांना योजनेला विरोध करण्याचे आवाहन केले आहे.इंटलेजिन्स ब्युरोच्या त्या महिला अधिकाऱ्याने या पुस्तिकेबाबत धर्मावत यांना विचारणा केली. त्यातील माहिती कोणी दिली, कुठून मिळविली, त्याची सत्यता तपासून पाहिली अथवा नाही, आतापर्यंत त्याचे वाटप कोणाकोणाला केले, असे अनेक प्रश्न धर्मावत यांना विचारण्यात आले. त्याचबरोबर धर्मावत यांच्या राजकीय पार्श्वभूमीबाबतही माहिती घेण्यात आली. कायदा शाखेचे पदवीधर असलेल्या धर्मावत यांनी कशासाठी माहिती घेत आहात, असे त्यांना विचारल्यानंतर वरिष्ठ कार्यालयाचा आदेश आहे, असे सांगण्यात आले. 1धर्मावत यांनी विरोधकांची अशी चौकशी करणे अयोग्य असल्याचे सांगितले. पीपल्स युनियनच्या वतीने याच्या निषेधार्थ स्मार्ट सिटी कंपनी संचालक मंडळाच्या १६ जुलैच्या बैठकीत कार्यालयाबाहेर निदर्शने करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.2एसआयबीच्या पुण्यातील कार्यालयाकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. याविषयाबाबत आम्हाला काहीही बोलायचे नाही, चौकशी करण्यात आली किंवा नाही, याबाबत सांगू शकणार नाही, असे उत्तर देण्यात आले.एसआयबीच्या माध्यमातून चौकशी सुरूइंटलेजिन्स ब्युरो ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत काम करणारी विशेष शाखा आहे. एसआयबी नावाने त्यांची राज्यात शाखा असते. केंद्र सरकारला राजकीय, सामाजिक घटना, गुन्हेगारी कारवाया यांची माहिती देण्याचे काम या विभागामार्फत करण्यात येते. त्यांना स्मार्ट सिटी योजनेच्या विरोधकांची माहिती घेण्याचे काम लावण्यात आल्याचे यावरून दिसते आहे. धर्मावत यांच्याकडून ती पुस्तिकाही त्या महिला अधिकाऱ्याने मागून घेतली. लेखन स्वत: केले आहे की अन्य कोणी करून दिले, अशीही विचारणा धर्मावत यांच्याकडे करण्यात आली.
स्मार्ट सिटीचे विरोधक रडारवर
By admin | Published: July 14, 2016 12:59 AM