पुणे : स्मार्ट सिटीने प्रकल्प राबविताना लोकप्रतिनिधी व अनुभवी तज्ज्ञांच्या सूचना विचारात घेऊन ‘स्मार्ट सिटी मिशन’च्या मार्गदर्शक तत्वानुसार कामे करावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी केल्या. स्मार्ट सिटीच्या कामात पारदर्शकता आणून निधीचा योग्य उपयोग करावा. तसेच स्मार्ट सिटीकडून सुरू असलेली कामे ही शहरातील सुविधा, सौंदर्य आणि वैभवात भर घालणारी ठरावीत अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
‘पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कोपोर्रेशन लिमिटेडच्या’ स्मार्टसिटी अॅडव्हायजरी फोरमची पाचवी बैठक पवार यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पुण्यातील विधानभवन सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी स्मार्ट सिटीच्या कामांचा सविस्तर आढावा घेऊन, स्मार्ट सिटी संदर्भातील पुणे शहराचे राष्ट्रीय रँकिंग सुधारण्याचा प्रयत्न करावा असे सांगितले.यावेळी खासदार गिरीश बापट, आमदार माधुरी मिसाळ, चेतन तुपे, सुनील टिंगरे, सुनील कांबळे, सिद्धार्थ शिरोळे, विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार, पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कापोर्रेशन लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते, पुणे महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, अॅडव्हायजरी फोरमचे सदस्य सतीश मगर, अनिरुद्ध देशपांडे तसेच अन्य पदाधिकारी व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
स्मार्ट सिटीने आपल्या कामात पारदर्शकता आणून कोणतीही कसर राहणार नाही याची दक्षता घ्यावी. तसेच विभागीय आयुक्त व महापालिका आयुक्त यांच्याशी समन्वय साधूनच स्मार्ट सिटीने सुरू असलेली शहराती येईल कामे पूर्णत्वास न्यावीत असेही पवार यांनी यावेळी सांगितले.या बैठकीत खासदार गिरीश बापट यांच्यासह उपस्थित लोकप्रतिनिधींनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असलेल्या प्रकल्पासंदर्भात सूचना केल्या व ही कामे जलद पूर्ण करावीत, असेही त्यांनी सुचविले. यावेळी पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कापोर्रेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय कोलते यांनी स्मार्ट सिटी अंतर्गत सुरू असणाऱ्या कामांचे सादरीकरण करुन उपस्थितांना माहिती दिली.
-----------------------------