पुणे : नागरिकांच्या समस्या सोडवेल तोच खरा स्मार्ट नगरसेवक. तसे व्हायचे असेल तर त्यासाठी प्रभागाचा अभ्यास, महापालिकेच्या कामकाज पद्धतीचा अभ्यास करणे आवश्यक आहे. असा अभ्यास करायला त्वरित सुरुवात करा, असे आवाहन महापौर मुक्ता टिळक यांनी महापालिका नगरसेवकांना केले.ज्ञानेश्वरी प्रतिष्ठान व धनंजय देशपांडे यांनी सर्वपक्षीय नवनिर्वाचित नगरसेवकांसाठी शनिवारी एका सभागृहात आयोजिलेल्या ‘स्मार्ट पुण्याचा मी स्मार्ट नगरसेवक’ या कार्यशाळेचे उद््घाटन टिळक यांच्या हस्ते झाले. ‘पुण्याच्या सर्वांगीण विकासामध्ये समर्पित भावनेने कार्यरत राहून शहर अधिक स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न करीत राहीन,’ अशी शपथ या वेळी महापौरांनी सर्व नगरसेवकांना दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते, माजी महापौर अंकुश काकडे, महापालिका उपायुक्त ज्ञानेश्वर मोळक, धनंजय देशपांडे, डॉ. कल्पना बळीवंत, सुनील माळी यांनी महापालिकेच्या कामकाजाविषयी नगरसेवकांना मार्गदर्शन केले. डॉ. विजय कुलकर्णी यांनी ‘पाच वर्षांच्या काळाचे कार्य नियोजन,’ डॉ. दत्ता कोहिनकर यांनी ‘तणावमुक्ती व आंतरिक शक्ती विकास’ व डॉ. सायली कुलकर्णी यांनी ‘पुणेकर महिलांचे आरोग्य संवर्धन’ याविषयी मार्गदर्शन केले. सर्वच वक्त्यांनी नगरसेवकांना भाषण कसे करावे, एखाद्या विषयाचा अभ्यास कसा करावा, याविषयी सांगितले. धनंजय देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रसाद कुलकर्णी यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)
नागरिकांची कामे करेल तोच स्मार्ट नगरसेवक
By admin | Published: March 21, 2017 5:32 AM