राहुल गायकवाड पुणे : पुणे शहराला सायकलींचे शहर म्हणून अाेळखले जायचे. पुढे जाऊन पुण्याची अाेळख दुचाकींचे शहर अशी झाली. त्यामुळे वाहतूक काेंडीत माेठी भर पडण्यास सुरुवात झाली. त्यामुळे पुणेकरांनी पुन्हा सायकलींकडे वळावे यासाठी स्मार्ट सिटीच्या सहयाेगाने स्मार्ट सायकल शेअरिंग याेजना राबविण्यास सुरुवात करण्यात अाली. सुरुवातीला या याेजनेला चांगला प्रतिसाद मिळाला सध्या मात्र या याेजनेला फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र अाहे. त्यातच या याेजनेत अाता अनेक सायकल कंपन्या सहभागी झाल्याने शहरात सर्वत्र सायकलींची गर्दी पाहायला मिळत अाहे. असे असले तरी या याेजनेबाबत नागरिकांमध्ये जनजागृती केली जात नसल्याने पुणं हे नुसतं नावालात सायकलींच शहर हाेत आहे.
वर्षभरापूर्वी स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनच्या सहकार्याने शहरातील विविध भागात स्मार्ट शेअर सायकल याेजना सुरु करण्यात अाली. सुरुवातील कमी दरात या सायकली नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात अाल्या. त्यामुळे नागरिकांनी या याेजनेला चांगला प्रतिसाद दिला. सकाळी व्यायामासाठी या सायकलींचा वापर करण्यात येऊ लागला. तसेच जवळच्या ठिकाणी जाण्यासाठी सुद्धा या सायकली वापरण्यात येऊ लागल्या. सुरुवातील या याेजनेत एकच कंपनी सहभागी झाली हाेती. नंतर अनेक कंपन्या या याेजनेत सहभागी झाल्याने सायकलींची संख्या वाढली. काही कंपन्यांनी तर सुरुवातील माेफत सेवा देण्यास सुरुवात केली. त्यामुळे सायकल चाेरीला जाण्याचे प्रमाणही कमालीचे वाढले हाेते. नंतरच्या काळात मात्र या कंपन्यांनी भाड्याचे दर वाढवले. सुरुवातील एक रुपया प्रति अर्धातास या दराने एका कंपनीच्या सायकली भाड्याने मिळत हाेत्या. पुढे जाऊन हा दर दहा मिनिटांसाठी तीन रुपये इतका वाढवण्यात अाला. त्यामुळे नागरिकांनी या याेजनेकडे पाठ फिरवली. तसेच स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशन ही याेजना विविध भागात सुरु करण्यापलीकडे नागरिकांमध्ये विशेष जनजागृती करीत नसल्यामुळे या याेजनेला प्रतिसाद कमी मिळत अाहे. एकीकडे दुचाकींची संख्या राेज वाढत असताना दुसरीकडे या सायकली धुळ खात पडल्याचे चित्र अाहे. शहरात वाहनांची संख्या कमालीची वाढली अाहे. दरराेज या वाहन संख्येमध्ये भरच पडत अाहे. त्यामुळे वाहतूक काेंडी अाणि प्रदूषणातही माेठी वाढ हाेत अाहे. अशातच शेअर सायकल याेजना ही प्रभावी ठरली जाऊ शकत असताना या याेजनेबाबत स्मार्ट सिटी काॅर्पाेरेशनकडून गांभिर्याने पाहिले जात नसल्याने ही याेजना कागदावरच राहिली असल्याचे चित्र अाहे. केवळ सायकलींची संख्या फुटपाथवर वाढवून सायकलींचे शहर अशी अाेळख देण्याचा प्रयत्न केला जात अाहे. त्यामुळे येत्या काळात या याेजनेची जनसामान्यात जनजागृती हाेणार का असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.