पुणे : प्रभागातील विकासकामांचा पाठपुरावा करणे नगरसेवकांसाठी मोठी डोकेदुखी असते. यावर उपाय म्हणूनच प्रभागातील विकासकामांचा पाठपुरावा करणे, प्रस्तावास प्रशासकीय मान्यता मिळविणे यात वाया जाणारा वेळ वाचविण्यासाठी खास नगरसेवकांसाठी महापालिका स्वतंत्र ‘अॅप’ विकसित करणार आहे. नगरसेवक अमोल बालवडकर यांच्या प्रस्तावाला मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली, अशी माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी दिली.नगरसेवकांना त्यांच्या प्रभागातील विकासकामे करून घेण्यासाठी प्रस्ताव तयार करून सादर करावे लागतात. या प्रस्तावांच्या फाईल्स क्षेत्रीय कार्यालय, मुख्य खात्यांकडील कामांसाठी संबंधित खात्याकडे फाईल पाठवून त्यास मंजुरी घ्यावी लागते. याचा पाठपुरावा करताना नगरसेवकांचा वेळ वाया जातो. कामांची मंजुरी, त्यावर झालेली कार्यवाही याबाबत माहिती घेण्यासाठी अधिकाऱ्यांकडे हेलपाटे मारावे लागतात. अनेक वेळा योग्य माहिती दिली जात नाही, विचारणा करूनही अर्धवट माहिती दिली जाते.> वेळेचा हा अपव्यय टाळावा, कामे त्वरित मार्गी लागावी, यासाठी महापालिकेने हे ‘अॅप’ विकसित करावे असे प्रस्तावात नमूद करण्यात आले होते. या अॅपमध्ये कामाचे स्वरूप, निविदा प्रक्रिया, एस्टिमेट, विविध प्रकारची ना-हरकत प्रमाणपत्रे आदींची माहिती असावी. नगरसेवक आणि अधिकारी यांना हे अॅप मोबाइलमध्ये डाऊनलोड करता येईल. यामुळे कामाच्या फाईलची स्थिती नेमकी काय हे समजेल, असेही प्रस्तावात नमूद केले आहे.
प्रभागातील विकासकामांचा पाठपुरावा होणार ‘स्मार्ट’
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 2:19 AM