संजय माने, पिंपरी मोफत वायफाय सुविधा उपलब्ध झाली अन् संत तुकारामनगर जवळील महात्मा फुलेनगर झोपडपट्टी स्मार्ट होऊ लागली आहे. शहरातील उच्चभ्रू वस्तीतही अद्याप वायफाय सुविधा पोहचलेली नसताना, फुलेनगरमध्ये मात्र घराघरात वायफाय यंत्रणा पोहचली आहे. घर पत्र्याचे, पण हातात स्मार्ट फोन, असे दृश्य पाहावयास मिळत आहे. परीक्षेचा आॅनलाइन फॉर्म भरण्यापासून ते नोकरीचा अर्ज करण्यापर्यंत येथील तरुण मोफत वायफाय सेवेचा लाभ घेऊन प्रगती करू लागले आहेत. स्वयंसेवी संस्थेच्या सहकार्याने महात्मा फुलेनगर झोपडपट्टीत गरिबांसाठी इंटरनेट सुविधा मोफत देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. या प्रकल्पासाठी फोर्ड फाउंडेशनने निधी उपलब्ध करून दिला आहे. जानेवारी २०१४मध्ये या परिसरात ‘वायफाय’ सुविधा कार्यान्वित झाली. एक वर्षात येथील तरुण वर्गात इंटरनेट वापराबद्दल आमूलाग्र जागृती झाली. संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात या भागातील तरुणांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, असे दिसून आले. त्यामुुळे प्रकल्पासाठी शहरातील ७१ झोपडपट्ट्यांपैकी ही एक झोपडपट्टी निवडली गेली. प्रायोगिक तत्त्वावरील या प्रकल्पाने संपूर्ण झोपडपट्टी वायफाय झाली आहे. इंटरनेटचा वापर कसा करावा, कोणत्या दक्षता घ्याव्यात, याबाबतचे मार्गदर्शन आणि तांत्रिक प्रक्षिक्षण देण्यासाठी स्वाभिमान प्रशिक्षण केंद्र सुरू झाले. या केंद्रात संगणकाचे प्राथमिक शिक्षण दिले जाते. पूर्वी घोळक्याने बसलेले तरुण पत्ते खेळताना, गप्पा मारताना दिसून यायचे. हे चित्र आता बदलले असून, फुलेनगरमध्ये चौकाचौकात, रस्त्याच्या बाजूला हातात मोबाइल, टॅब, तसेच लॅपटॉप घेऊन बसलेले तरुण पाहावयास मिळतात. कोणी परीक्षेचा आॅनलाइन अर्ज भरतो, तर कोणी नोकरीचा शोध, आॅनलाइन शॉपिंग आणि अन्य माहिती मिळविण्याचा प्रयत्न करतात. मोफत इंटरनेट सेवा मिळाल्याने झोपडपट्टीतील प्रत्येक मोबाइलधारकाला घरबसल्या माहिती मिळविण्याच्या दृष्टीने जगाची सफर करणे शक्य झाले आहे. ज्यांच्याकडे साधे मोबाइल होते, त्यांच्या हातात आता स्मार्ट फोन आले आहेत. इंटरनेट, आॅनलाइन हे इतरांसाठी परवलीचा बनलेले शब्द आमच्यासाठी कठीण होते. परंतु, स्वयंसेवी संस्थेने राबविलेल्या प्रकल्पामुळे आम्हाला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. आमच्या अनेक सहकारी, मित्रांनी आॅनलाइन नोकरीचे अर्ज करून रोजगार मिळविले. अलीकडच्या काळात सर्व काही आॅनलाइन झाले आहे. त्याचा फायदा झोपडपट्टीत राहणाऱ्यांनाही मिळू लागला आहे. नितीन यादव, जितेंद्र यादव या तरुणांनीही मोफत वायफाय सेवेमुळे चांगला फायदा होत असल्याचे नमूद केले. यापूर्वी कोठे तरी पत्ते खेळणारे, तासन्तास गप्पा मारण्यात वेळ घालविणाऱ्यांना आता अभ्यासाची गोडी निर्माण झाली आहे. शहराच्या अन्य भागांत राहणाऱ्यांना इंटरनेटसाठी दरमहा अडीचशे ते तीनशे रुपये खर्च करावे लागतात. आम्हाला मोफत आणि अमर्याद इंटरनेट वापराची संधी मिळाली असल्याने स्वत:ला भाग्यवान समजतो, असे स्थानिक रहिवाशी किरण देवदुर्ग यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
महात्मा फुलेनगर झोपडपट्टी होतेय स्मार्ट
By admin | Published: November 12, 2015 2:27 AM