बाणेर-बालेवाडीतील स्थिती : ३ ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड पुणे : केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत एरिया डेव्हल्पमेंटसाठी निवडण्यात आलेला बाणेर-बालेवाडीचा परिसरात तब्बल ८० तास अंधारात होता. या भागाला वीज पुरवठा करणाऱ्या ३ ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने या परिसरात अनेक सोसायट्या १२ तासांपासून ८० तासांपर्यंत अंधारात होत्या. दरम्यान, या प्रकारामुळे संतप्त झालेल्या या परिसरातील रहिवाशांनी या प्रकाराचा जाब विचारण्यासाठी थेट रस्ता पेठ येथील महावितरणचे कार्यालय गाठत या प्रकरणी तत्काळ चौकशी करून संबधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी मुख्य अभियंता रामराव मुंडे यांच्याकडे केली. तसेच महावितरणच्या नियमानुसार, प्रत्येक ग्राहकाला प्रतितास ८० रूपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. महावितरणकडूनही देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, दुपारी तीननंतर वीजपुरवठा टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्यात आला असल्याचा दावा महावितरणकडून करण्यात आला आहे.(प्रतिनिधी)...तर नियमानुसार भरपाई द्यावी- नियमानुसार, ट्रान्सफॉर्मर खराब झाल्यानंतर पुढील अठरा तासांत त्याची दुरूस्ती न झाल्यास वीज पुरवठा खंडित झालेल्या ग्राहकाला प्रतितास १०० रूपयांची भरपाई देण्याची तरतूद आहे. - तसेच पावसाळ्यापूर्वी या भागातील देखभाल दुरूस्तीकडे दुर्लक्ष करणाऱ्या कर्मचाऱ्यांची, तसेच अधिकाऱ्यांची तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आल्याचे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी सांगितले.धनकवडीत ५० तास वीजपुरवठा खंडित बाणेर-बालेवाडीप्रमाणेच धनकवडी परिसराचीही स्थिती तशीच आहे. या परिसरातही सुमारे १८ हून अधिक ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने शनिवारी रात्रीपासून अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यातच महावितरणची हेल्पलाईन सेवाही कोलमडल्याने नागरिकांमध्ये मोठा संताप होता. तर, अनेक नागरिकांनी परिसरातील कर्मचाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनीही मोबाईल बंद ठेवल्याने नागरिकांची चांगलीच हेळसांड झाली. अनेक सोसायट्यांना पाण्यासाठी टँकरचा आधार घ्यावा लागला, तर काही सोसायट्यांना पाण्यासाठी जनरेटर आणि पाणी खेचणाऱ्या मोटारची सोय करावी लागली.या तासात १२ तासांपासून ८० तासांपर्यंत वीज पुरवठा खंडीत झालेला आहे. त्यामुळे महावितरणने कोणतीही आठकाडी न आणता ग्राहकांना ही भरपाई द्यावी.
‘स्मार्ट’ भाग ८० तास अंधारात
By admin | Published: July 06, 2016 3:24 AM