पुणे : स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तहकूब केल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगानंतर महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉँग्रेसने पालिकेची स्वायत्तता जपण्यासाठी उपसूचनेसह स्मार्ट सिटी आराखडा मंजूर केला जाईल, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, त्यामुळे आराखडा केंद्र सरकारकडूनच नामंजूर होण्याची भीती आहे. राज्य शासनाच्या आदेशानुसार स्मार्ट सिटी आराखडयाचा प्रस्ताव १४ डिसेंबरच्या मुख्यसभेत ठेवला जाणार आहे. याबाबत महापालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सभागृह नेते बंडू केमसे भूमिका स्पष्ट करताना म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी आराखड्याची अंमलबजावणी स्पेशल पर्पज व्हेईकल (एसपीव्ही) म्हणजे एका कंपनीमार्फत करण्याची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे महापालिकेची स्वायत्तता धोक्यात येणार असल्याची भीती नगरसेवकांनी सभागृहात व्यक्त केली होती. यापार्श्वभूमीवर महापालिकेची स्वायत्तता धोक्यात येणार नाही, याची पूर्ण खबरदारी स्मार्ट सिटीचा आराखडा मंजूर करायचा, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसकडून घेण्यात आली आहे.स्मार्ट सिटी आराखड्यामध्ये टाकण्यात आलेली स्पेशल पर्पज व्हेईकलची अट काढून टाकण्याची उपसूचना देऊन हा प्रस्ताव मंजूर करण्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संमती देणार असल्याचे केमसे यांनी सांगितले. स्मार्ट सिटीचा आराखडा मंजूर करण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका सर्वांत महत्त्वाची ठरणार आहे. काँग्रेस, मनसे या पक्षांकडून स्मार्ट आराखड्याला मोठा विरोध केला जात आहे. तर, भाजपा व शिवसेनेने स्मार्ट सिटी आराखड्याला पाठिंबा दिला आहे. भाजपा व शिवसेनेच्या मदतीने राष्ट्रवादी काँग्रेस हा आराखडा मंजूर करू शकते किंवा मनसे व कॉंग्रेसच्या पाठिंब्याने फेटाळून लावू शकते.
स्वायत्तता जपून स्मार्ट आराखडा मंजूर करणार
By admin | Published: December 11, 2015 1:02 AM