- रश्मी शुक्लांनी स्वीकारली पोलीस आयुक्तपदाची सूत्रेपुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्मार्ट सिटी संकल्पनेच्या निकषांमध्ये पुणे शहराला बसविण्यासाठी ‘स्मार्ट पोलिसिंग’ करणार असून, ही संकल्पना राबविण्यासाठी आपल्याला पाठविल्याचे पुण्याच्या नवनियुक्त पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी पत्रकारांना सांगितले. दहशतवाद, जातीयवाद आणि लष्कराच्या महत्त्वाच्या कार्यालयांची सुरक्षा हे आपल्या अजेंड्यावरील विषय असल्याचेही त्यांनी सांगितले.मावळते पोलीस आयुक्त के. के. पाठक यांच्याकडून शुक्ला यांनी गुरुवारी सायंकाळी आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारली. शुक्ला या १९८८ च्या तुकडीच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्या सध्या राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आयुक्त म्हणून काम करीत होत्या. याच विभागात त्यांनी सहआयुक्त आणि त्यानंतर आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडली. यासोबतच त्यांनी मुंबई पोलीस दलातही विविध पदांवर काम केलेले आहे. ‘अत्यंत कडक शिस्तीच्या’ अशी त्यांची पोलीस दलात ओळख आहे. मीरा बोरवणकर यांच्यानंतर पुण्याच्या पोलीस आयुक्त होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला अधिकारी आहेत. त्यांचे भूगर्भशास्त्र विषयामध्ये पदव्युत्तर शिक्षण झालेले आहे. राज्य शासनाने गुरुवारी त्यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला. शुक्ला म्हणाल्या, ‘‘यापूर्वी गुप्तवार्ता विभागामध्ये काम केलेले असल्यामुळे पुण्याचे नेमके प्रश्न माहिती आहेत. तेथील माहितीचा वापर कामामध्ये अवश्य करून घेणार आहे. याखेरीज, अन्य विषयांची आणि समस्यांची सहकारी अधिकाऱ्यांकडून माहिती करून घेणार आहे. स्मार्ट सिटी ही संकल्पना पुण्यामध्ये आकाराला यावी, यासाठी प्रयत्न करीन. सहयोगी अधिकाऱ्यांची ‘स्मार्ट पोलिसिंग’साठी मदत घेणार आहे. पोलीस दलाचा प्रतिसाद, उपलब्धता आणि जागरूकता वाढविण्यावर भर देणार आहे. पुणे धार्मिकदृष्ट्या संवेदनशील असल्यामुळे कायदा-सुव्यवस्था कायम राखणे हीसुद्धा एक मोठी जबाबदारी आहे. सांस्कृतिक नगरी पुण्याच्या लौकिकात आणखी भर घालण्याचा माझा प्रयत्न राहील. मी नागरिकांच्या सेवेसाठी २४ तास उपलब्ध असेन. ’’ (प्रतिनिधी)
‘स्मार्ट पोलिसिंग’ राबविणार
By admin | Published: April 01, 2016 3:34 AM