'स्मार्ट पोलिसींग'उपक्रमामुळे पोलीस प्रशासन अधिकाधिक लोकाभिमुख आणि सुसज्ज होणार: उपमुख्यमंत्री अजित पवार
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2020 01:47 PM2020-08-15T13:47:02+5:302020-08-15T13:49:55+5:30
'कोरोना'विरूदधची लढाई आपण सर्व मिळून निश्चित जिंकू : अजित पवार
पुणे : 'स्मार्ट पोलिसींग' उपक्रमामुळे पोलीस दलामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत जलद प्रतिसादासोबतच पोलीस दल अधिक सतर्क होण्यास मदत होईल. अत्याधुनिक पोलीस स्टेशन, तंत्रज्ञान व दळणवळण, कामकाजात गतिमानता, जनतेशी पोलिसांचे सलोख्याचे संबंध, तपासात गतिमानता, आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली, वाहतुकीचे नियमन, अभिलेख देखभाल व प्रशिक्षण यामुळे पोलीस दल अधिक सुसज्ज होण्यास मदत होईल,असा विश्वास राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.
पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे ग्रामीण पोलीस विभागाच्या 'स्मार्ट पोलिसींग' उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी विभागीय आयुक्त सौरभ राव, 'पीएमआरडीए'चे आयुक्त सुहास दिवसे, पोलीस अधिक्षक संदीप पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.जयश्री कटारे यांच्यासह पोलीस विभागाचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.यावेळी उत्कृष्ट कामगिरी केलेल्या पोलीस अधिकारी, कर्मचारी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पवार म्हणाले, पोलीस स्टेशनच्या कामकाजात सुसुत्रता यावी तसेच वातावरण चांगले राहावे यासाठी स्मार्ट पोलिसींग उपक्रम राबविला जात आहे. महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी गावोगावी महिला सुरक्षा समित्यांचीही स्थापना करण्यात आली आहे. पुणे जिल्हयातील पोलीस स्टेशनच्या आधुनिकीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची तरतूद करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
केंद्रीय गृहमंत्रालयाकडून महाराष्ट्रातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक, शौर्य पोलीस पदक आणि पोलीस पदक जाहीर करण्यात आली आहेत. या पुरस्कारप्राप्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, कोरोनाच्या संकटकाळात पोलीस बांधव मोठ्या जिद्दीने, शर्थीने रस्त्यावर उतरून कार्यरत आहेत. पोलिसांच्या कुटुंबियांनी याकामी त्यांना दिलेली साथ महत्त्वाची आहे, त्यामुळे त्यांना मनापासून धन्यवाद दिले पाहिजेत. समाजाच्या भल्यासाठीच पोलीस कोरोनाच्या कालावधीत 'कोरोना' विरूदध लढले, आपण सर्व मिळून कोरोनाची ही लढाई निश्चित जिंकू, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला.