विश्वास खोड, पुणेमहापारेषण, दूरसंचार विभाग, वाहतूक पोलीस, महानगरपालिकेचा रस्ते, मलनि:सारण आणि पाणीपुरवठा विभाग, तसेच उद्यान विभाग व शहर नियोजन विभाग यांच्याकडून रस्त्यांवर होणाऱ्या एकाही कामाचा समन्वय एकमेकांशी नसतो. त्यामुळे वारंवार होणाऱ्या खोदाईमुळे कोट्यवधींच्या रस्त्यांची दुर्दशा होते. त्या पार्श्वभूमीवर सर्व घटकांमध्ये कायमस्वरूपी समन्वय असावा आणि संपूर्ण शहरातील रस्ते स्मार्ट व दर्जेदार राहण्यासाठी पुणे महानगरपालिकेने ‘अर्बन स्ट्रीट डिझाईन गाईडलाईन’चा आराखडा तयार केला आहे. शहरात झपाट्याने होणारी लोकसंख्या वाढ, फेरीवाल्यांचे रस्त्यावरील अतिक्रमण, महापालिका, शासन व खासगी कंपन्यांकडून विविध कामांसाठी होणारी रस्ते खोदाई, त्यामुळे अरुंद झालेल्या रस्त्यावर वाहतूककोंडी होते. नादुरुस्त रस्त्यावर पावसाळ्यात नागरिकांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो. रस्त्याचे डांबरीकरण केले की काही दिवसांनी त्याच रस्त्याच्या काही भागात ड्रेनेज किंंवा पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनसाठी खोदाई सुरू होते. कधी दूरध्वनीच्या केबल्ससाठी तर कधी वीजवाहक केबल्ससाठी खोदाई केली जाते. पदपथावर महापालिकेच्या उद्यान विभागातर्फेच झाडे लावली जातात. विद्युत मंडळातर्फे ‘ट्रान्सफॉर्मर्स’ किंवा अन्य कामांसाठी खोदाई केली जाते. खासगी कंपन्याही रस्ते किंंवा पदपथ खोदून कामे करतात. त्यामुळे शहरात नवीन रस्त्याची काही दिवसांतच खोदाई सुरू होत असल्याची विचित्र परिस्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरासाठी एकात्मिक रस्ते विकासाची मार्गदर्शक तत्त्वे करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. त्यामुळे महापालिकेने मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यासाठी तज्ज्ञांची समिती (स्टॅक कमिटी) स्थापन केली होती. समितीने इंडियन रोड काँग्रेसच्या (आयआरसी) मार्गदर्शक तत्त्वांचा अभ्यास केला. त्यासाठी वेळोवेळी बैठका झाल्या. त्यानंतर संपूर्ण शहरासाठी एकच मार्गदर्शक तत्त्व तयार करण्यात आले आहे. २०३० मध्ये रस्ते कसे असावेत? याचा आराखडा तयार केला आहे. नगर उपअभियंता विवेक खरवडकर यांनी आराखड्यासाठी पाठपुरावा केला.
पुण्याचे रस्ते होणार स्मार्ट
By admin | Published: December 22, 2014 5:24 AM