पुणे : विद्युत तारांवर आकडा टाकून विजेची चोरी केली जात असल्याचे अनेकांना माहीत आहे. मात्र, विद्युत मीटरशी छेडछाड करुन किमान पन्नास पद्धतीने मीटरमध्ये फेरफार करुन वीज चोरी केली जात आहे. त्यामुळे विद्युत मीटर अधिक सुरक्षित करण्याचे आव्हान महावितरणसमोर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. घरगुती अथवा औद्योगिक वीजचोरीसाठी चोरट्यांकडून पुर्वी विद्युत तारांवर आकडे टाकण्याची पद्धत सर्रास वापरली जात होती. ग्रामीण भागात आजही असे प्रकार दिसून येतात. शहरातील बहुतांश विद्युत वाहिन्या या भूमीगत झाल्याने शहरी भागात हा प्रकार तुलनेने कमी झालेला दिसतो. पुर्वी, मीटरमधील चकती लोखंडाची होती. तेव्हा ती लोहचुंबक लावून चकतीचे फिरणे थांबविले जायचे. पुढे चकतीसाठी लोखंडाचा वार बंद झाला. तसेच, मीटरही डिजिटल आकड्यांचे झाले. मीटर आधुनिक झाली, तशी त्या प्रमाणे चोरही अनेक क्लृप्त्या लढवून विद्युत चोरीचे नवीन मार्ग शोधत असल्याचे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सामाजिक कार्यकर्ते वाजित खान यांनी भवानी पेठेतील एका उपविभागाची माहिती मिळविली. या लहानशा भागामध्ये २०१२ पासून फेब्रुवारी २०१९ या कालावधीत १७२ विद्युत चोऱ्या उघड झाल्या. त्यातून ७२ लाख ३६ हजार रुपयांची वीज चोरी पकडली गेली. पुणे शहरामध्ये पद्मावती, पर्वती, रास्तापेठ, बंडगार्डन, अहमदनगर रस्ता, शिवाजीनगर आणि कोथरुड विभाग येतात. त्यामुळे विजचोरीची हा आकडा कितीतरी अधिक असल्याचे स्पष्ट होते. मीटर अॅसिड टाकून खराब करणे, मीटर गरम पाण्यात टाकून पुन्हा बसविणे, मीटरच्या यंत्रणेत फेरफार करुन वीज चोरी करणे अशा अनेक प्रकारे विज चोरी होत आहे. याबाबत माहिती देताना महावितरणच्या दक्षता विभागाचे प्रमुख शिवाजी इंदलकर म्हणाले, विद्युत चोरी हा प्रकार उंदीर मांजराचा खेळ आहे. महावितरण जितक्या सुधारणा करेल, तितक्या वेगवेगळ्या पद्धतीने वीजचोर नवीन प्रकारे वीज चोरी करीत आहेत. जवळपास ५० हून अधिक प्रकारे वीज चोरी केली जात आहे. मीटरमध्ये फेरफार करण्यापासून, विद्युत तारांवर आकडे टाकण्याच्या पद्धतीचा त्यात समावेश होतो. चोरांच्या सर्व क्लृप्त्या जाहीर करु शकत नाही. अन्यथा तशा पद्धतीच्या चोºयांमध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. --------------
स्मार्ट वीज चोरीची चाके फिरतात गरागर : महावितरणसमोर आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 6:00 AM
घरगुती अथवा औद्योगिक वीजचोरीसाठी चोरट्यांकडून पुर्वी विद्युत तारांवर आकडे टाकण्याची पद्धत सर्रास वापरली जात होती.
ठळक मुद्देनवनवीन प्रकारामुळे मीटरमध्येही करावा लागतो बदल जवळपास ५० हून अधिक प्रकारे वीज चोरी