पुणे : नो-पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर कारवाई करीत असलेल्या वाहतूक पोलिसांच्या वाहनाला सुसाट आलेल्या एका मोटारीने जोरात धडक दिली. या अपघातात एका महिलेसह वाहतूक शाखेचे तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. हा अपघात फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारासमोरील चौकात बुधवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डेक्कन वाहतूक शाखेच्या पोलीस हवालदार संध्या काळे या टोर्इंग व्हॅनवर नेमणुकीस होत्या. फर्ग्युसन रस्त्यावर त्या नो पार्किंगमध्ये लागलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर कारवाई करीत होत्या. हे काम सुरू असताना काळे, निखिल भोसले, अनिल नलावडे, प्रवीण कांबळे आणि चौरे नावाच्या महिला टोर्इंग व्हॅनजवळ उभ्या होत्या. त्या वेळी गुडलक चौकाकडून भरधाव आलेली लाल रंगाची एक मोटार थेट या व्हॅनला येऊन धडकली. काळे पटकन बाजूला सरकल्यामुळे वाचल्या. मात्र भोसले, नलावडे, कांबळे आणि चौरे यांना धडक बसली. या अपघातात चौघेही जखमी झाले.रस्त्यावर घबराटअचानक घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकही घाबरले होते. डेक्कन पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली. वाहतूक पोलिसांनी अपघातग्रस्त मोटार पोलीस चौकीमध्ये हलवली. काळे यांच्या फिर्यादीवरून मोटारचालक निकीता बोरा (रा. शिरोळे रस्ता, शिवाजीनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुसाट मोटारीने चौघांना उडवले
By admin | Published: March 30, 2017 2:57 AM