कुणी मनमुराद हसतं तर कुणी हळूच, कुणी मुरक्या मुरक्या हसतं तर कोणी कधी गोड हसतं, कुणी स्मित करतं तर कुणी खळखळ हसतं. कुणी कधी तरी अचानक फिदफिद हसतं, हसताय ना. कसे ? ते मी नाही विचारणार. आरश्यात बघा म्हणजे तोच सांगेल. एकदा असेच आम्ही मित्रमंडळी रात्री जेवण झाल्यावर गप्पा मारत बसलो होतो. गप्पा रंगत आल्या आणि अचानक एकाने जोरात ढेकर दिला आणि आम्ही बाकी मित्र खूप हसलो आणि त्याला म्हणालो अरे थोडं कमी जेवत जा, रात्रीच्या वेळेस. वयाची पन्नाशी होऊन गेली आहे आपली. अचानक दुसरा मित्र म्हणाला बरं झालं बाबा ढेकरच दिलास, नाही तर या वयात म्हणे आजकाल पोटात गॅसेसचे प्रमाण वाढत असते आणि पुन्हा सारे हसले मी त्याला म्हटलं अरे या वयात म्हणजे काय म्हणतोस, तुला अनुभव नाही का ? आणि पुन्हा हास्याची खसखस पिकली. गमतीचा भाग वेगळा पण खरच हास्याचे रंग हे, जीवनात खूप महत्वाचे असतात. नुसती कल्पना करा की जीवनात हास्य नसते तर? जीवन किती निरस, रटाळ झाले असते. आनंद व्यक्त करण्यात अडचण आली असती. हास्य हे बिन पैशाचे टॉनिक आहे, हास्य हे निराश मनावरचे सुंदर औषध आहे. अधूनमधून हसत राहिले की मन निराश राहत नाही. निखळ हास्य हे आरोग्याला खूप फायदेशीर असतं. हसल्याने चेहऱ्यावरचे स्नायू मोकळे होतात. रक्ताभिसरण चांगले होते आणि आरोग्य ही हसत राहतं.
आजकाल बऱ्याच ठिकाणी हास्यक्लब निघाले आहेत. आमच्या घराच्या शेजारीच सकाळी सकाळी हास्याचे फवारे ऐकू येतात
हा हा हा, ही ही ही, मात्र विनाकारण एकट्याने उगीचच दिवसभर आपलं सतत हसत राहू नये नाही तर वेगळा अर्थ निघेल. हास्य हे हृदयातून आले पाहिजे. आपले ओठ व मन उघडे करून हसणारे व्यक्ती नेहमीच सर्वांना आवडते कारण त्यातून मोती आणि आत्म्याचे दर्शन घडते. हास्य ही जीवनाची संजीवनी आहे. हास्य हे आनंदाचे व्यक्त रूप आहे. मात्र, दुसऱ्यावर कधीच हसू नये. दुसऱ्यावर हसणे खूप सोपे असते. पण स्वत:वर हसणे खूप अवघड आहे. हो मित्रांनो, हास्य आणि उत्साह हे जिवंतपणाचे लक्षण आहे आणि हसऱ्या चेहऱ्याचे सर्वत्र स्वागतच होत असते. मानवी मनाला हर्ष भावनेचा स्पर्श झालाच पाहिजे म्हणजे मन कधी नकारात्मकतेकडे सहसा जात नाही आणि हो विनोदात ही सहजता असावी.