पुणे : मंगळवार पेठेतील भीमनगर वसाहतीमधील जळीतग्रस्तांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम मुस्लिम समाजाने केले असून, समाजातील प्रतिष्ठित आणि मशिदींमधून गोळा केलेल्या निधीमधून पक्की घरे बांधून देण्यात येत आहेत. सर्वांना एकाच उंचीची घरे बांधून देण्यात येत असून, या कामामध्ये बंधूभाई भाईचारा संस्थेसोबतच स्थानिक नागरिक, राजकीय नेते आणि सर्वधर्मीयांचे मोलाचे सहकार्य मिळाले आहे. ४० कष्टकऱ्यांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी एकत्र आलेले हात हिंदू मुस्लिम ऐक्याचा नवा आदर्श घालून देत आहेत. मंगळवार पेठेतील भीमनगर वसाहतीमध्ये गेल्या महिन्यात भीषण आग लागली होती. या आगीमध्ये ४० कष्टकऱ्यांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. अनेकांचे संसार उघड्यावर आले होते. तेव्हापासून ४० जळीतग्रस्त कुटुंबे जवळच्याच मनपाच्या शाळेमध्ये राहत होती. नगरसेवक अजय तायडे यांनी त्यांची राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था केली आहे. दुर्घटना घडल्यानंतर बंधुभाव भाईचाराच्या कार्यकर्त्यांनी पाहणी करुन सर्व जळीतग्रस्तांची यादी केली होती. यासोबतच नगरसेवक अजय तायडे, गणेश बिडकर, माजी नगरसेवक लक्ष्मण आरडे, सामाजिक कार्यकर्ते मुख्तार शेख यांच्याशी संस्थेने संपर्क साधला. या सर्वांनी मदत करण्याचा निर्णय घेतला. संस्थेचे अध्यक्ष शाबीरभाई शेख, उपाध्यक्ष यासीनभाई शेख यांनी या कामात पुढाकार घेतला.महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष पी. ए. इनामदार, सामाजिक कार्यकर्ते सुलतानभाई, हाजी जकारिया मेमन यांनीही मोठा आर्थिक हातभार लावला. यासोबतच पुण्यातील छोट्या मोठ्या मशिदींमधूनही निधी जमा करण्यात आला. कागदीपुरा मशिदीच्या देखरेखीखाली या ठिकाणी प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात करण्यात आली आहे. घरांचा पाया भरुन चौथरे बांधण्यात आले आहेत. यासोबतच लोखंडी खांब उभे करण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)
जळीतग्रस्तांच्या चेहऱ्यावर हसू
By admin | Published: May 31, 2016 2:20 AM