लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कॅम्पमधील हचिंग्स हायस्कूलमध्ये ९५-९६ टक्के गुण मिळवून प्रथम येऊ, अशी अपेक्षा ठेवलेल्या मुस्कान पठाणला प्रत्यक्षात ९९.४० टक्के गुण मिळून ती देशात पहिली आली. निकालाची माहिती मिळताच तिचा काही वेळ स्वत:च्याच गुणपत्रकावर विश्वास बसत नव्हता. देशात पहिली आल्याच्या या सुखद धक्क्याने तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. आयसीएसई बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सोमवारी जाहीर झाला. मुस्कानच्या उज्ज्वल यशाची माहिती मिळताच तिची आई शकिरा, वडील अब्दुल्ला व भाऊ रोनक यांच्यासह तिने शाळेत धाव घेतली. या वेळी शाळेत तिची वाट पाहत असलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी गराडा घातला. हायस्कूलच्या प्राचार्या रिटा कटावती यांच्यासह सर्वच शिक्षकांनी तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला. मुस्कानची आई शकिरा या डॉक्टर आहेत, तर वडील सॉफ्टवेअर इंजिनिअर असून मुंबईच्या एका कंपनीत नोकरीस आहेत. मुस्कानने अभ्यासाव्यतिरिक्त स्विमिंग आणि बॅडमिंटन खेळण्याची आवड आवर्जून जपली आहे. प्राचार्या रिटा कटावती यांनी सांगितले, ‘‘विद्यार्थ्यांच्या सातत्याने टेस्ट सिरीज घेऊन आम्ही त्यांची तयारी करून घेतली. मागील वर्षी आमचा विद्यार्थी देशात तिसरा आला होता.अभ्यासाचा ताण घेतला नाही. यशाचे गमक उलगडताना मुस्कान म्हणाली, ‘‘मी कोणताही ताण घेऊन दहावीचा अभ्यास केला नाही. टिव्ही पाहत, आयपीएलच्या मॅचेसचा आनंद घेत अभ्यास केला. चित्रपटही आवर्जून पाहिले. माझ्या पालकांनी मला अभ्यासासाठी कधी जबरदस्ती केली नाही. भविष्यात मला डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करायची आहे.’’ मुस्कानच्या आई शकिरा यांनी सांगितले, ‘‘आम्ही अभ्यास कर म्हणून तिच्या कधीही मागे लागलो नाही. नियोजन करून, त्यानुसार तिने अभ्यास केला. मी तिच्या जेवणाच्या वेळा सांभाळण्याचा प्रयत्न मी केला.’’
मुस्कानला बसला सुखद धक्का
By admin | Published: May 30, 2017 2:56 AM