पुणे: राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) मधून एप्रिल २०२३ ते फेब्रुवारी २०२४ दरम्यान पुण्यात शुन्य ते १८ वयाेगटातील बालकांच्या अपेंडिक्स, आर्थाेपेडिक, दात, तिरळेपणा अशा १४ प्रकारच्या शस्त्रक्रियांच्या प्रकारांपैकी २ हजार ९७७ शस्त्रक्रिया विविध याेजनांमधून माेफत झाल्या आहेत. त्यामुळे, या बालकांच्या पालकांची लाखाे रूपयांची बचत झाली आहे.
राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमंतर्गत ० ते १८ वर्ष वयोगटातील बालकांची व मुलांची आरोग्य तपासणी करण्यात येते. पुणे जिल्हाअंतर्गत एकुण ७३ आरोग्य तपासणी पथके आहेत. प्रत्येक पथकामध्ये १ पुरुष वैद्यकिय अधिकारी, १ स्त्री वैद्यकिय अधिकारी, १ औषध निर्माता आणि १ परिचारीका यांचा समावेश असतो. अंगणवाडी स्तरावरील बालकांची तपासणी वर्षातून दोन वेळा करण्यात येते आणि शालेय स्तरावरील मुलांची तपासणी वर्षातून एक वेळा करण्यात येते. तपासणी दरम्यान आढळून येणाऱ्या आजारी बालके/ मुलांना योग्य ते उपचार देण्यात येतात व त्यांचा पाठपुरवठा करण्यात येतो.
तपासणी दरम्यान आढळून येणाऱ्या लाभार्थी मधील जन्मतः व्यंग, जीवनसत्वांच्या कमतरते आभावी होणारे आजार, शारीरिक व मानसिक विकासात्मक विलंब व आजार या बाबींचे वेळेवर निदान करुन अशा मुलांना पुढील योग्य ते उपचार देण्यासाठी उच्चस्तरीय रुग्णालयात संदर्भात करण्यात येते. शिवाय अशा संदर्भित केलेल्या मुलांना व त्यांच्या पालकांना योग्य ते मार्गदर्शन करुन मुलांच्या शस्त्रक्रियेचा वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येतो.
सन २०१९ पासुन राज्यस्तरावरुन विविध रुग्णालयाशी सांमजस्य करार ते १८ वयोगटातील बालक/ मुलांचे एकूण ४६ मुलांच्या कानाच्या क्वाक्लिअर इंप्लांट या शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधी मधुन करण्यात आलेल्या आहेत. या शस्त्रक्रियेसाठी प्रत्येकी ५ लाख २० हजार इतका खर्च करण्यात आलेल्या आहेत. तसेच सन २०१८ ते फेब्रुवारी २०२४ पर्यंत एकुण १०५३ हदय शस्त्रक्रिया राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रमांतर्गत करण्यात आलेल्या आहेत. या शस्त्रक्रिया चिंचवडमधील मोरया हॉस्पीटल, मुंबईतील कोकिळाबेन हॉस्पीटल, नाशिकमधील इंदोरवाला मेमोरियल हॉस्पीटल बाणेरचे ज्युपिटर हॉस्पीटल व मुंबईतील फोर्टिस हॉस्पीटल येथे करण्यात आलेल्या आहेत.