पुणे: कोरोनाच्या दुस-या लाटेमध्ये संसर्गाने बळी जाणा-यांच्या संख्येत वाढ झाल्यामुळे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये एकाच दिवशी अत्यंस्कारांचे प्रमाण वाढले आहे. स्मशान भूमीतील विद्युत दाहिनीवरील चिमणीची उंची कमी असणे, सतत वाढते धुराचे प्रदूषण, त्यामुळे होणारे वायू प्रदूषण व त्यासोबत परिसरात पसरणारी राख अशा स्मशानभूमीच्या अवैज्ञानिक व्यवस्थापनाविषयी चिंता व्यक्त करणारी एक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली आहे. याचिकेची सुनावणी दि. १२ मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुळकर्णी यांच्या समोर होणार आहे.
नवी पेठेतील रहिवासी विक्रांत धनंजय लाटकर यांनी अँड असीम सरोदे,अँड अजित विजय देशपांडे व अँड. अजिंक्य उडाणे यांच्यामार्फत ही याचिका न्यायालयात दाखल केली आहे. स्मशानभूमीच्या वरच्या बाजूला असलेल्या चिमणीने उत्सर्जित केलेल्या गडद व जाड धूरातून आसपासच्या परिसरातली हवा प्रदूषित होत आहे. धूर मानवी आरोग्यासाठी घातक आहे आणि त्याचा नकारात्मक परिणाम हृदय आणि फुफ्फुसांवर दिसून येतो असे याचिकेत नमूद आहे. नवी पेठ. सदाशिवेपेठ, पर्वती पायथा, दांडेकर पूल वस्ती, फाटक बाग परिसर, रामबाग कॉलनी, लोकमान्य नगर, विजया नगर कॉलनी, दत्तवाडी गावठाण, सारसबाग इत्यादी ह्या भागातील नागरिकांना त्रास होत आहे. २५ आॅगस्ट २०२० मध्ये नॅशनल ग्रीन ट्रिब्यूनल (एनजीटी) ने पीएमसीविरूद्ध आदेश पारित केले असले तरी त्यानुसार कार्य करण्यास पालिका संपूर्णत: अपयशी ठरली आहे.
अॅड असीम सरोदे यांनी माहिती दिली की, महापालिकेला उच्च प्रतीची उपकरणे तसेच उच्च स्टॅक चिमणी व इतर गॅस चेंबरमधून बाहेर काढण्याचे निर्देश देण्यात यावेत, अशी मागणी याचिकेत आहे. जेणेकर येथील नागरिकांना त्याचा त्रास कमी होणार आहे. महाराष्ट्रातील स्मशानभूमीच्या व्यवस्थापनासाठी योग्य व पर्यावरणास अनुकूल वैज्ञानिक मार्गदर्शक सूचना निश्चित केल्या जाव्यात अशीही मागणी याचिकेत करण्यात आलेली आहे.
---------------------------------------------
सध्या मोठ्या संख्येने मृतदेह शव दहनासाठी आणण्यात येत आहेत, परंतु वास्तविक सत्य हे आहे की, स्मशानभूमीच्या आसपासचे नागरिक विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुले दाट धुरामुळे त्रस्त आहेत.
- विक्रांत लाटकर ,याचिकाकर्ते