शेलपिंपळगाव : खेडच्या पूर्व, तसेच शिरूरच्या पश्चिम पट्ट्यात सलग चौथ्या दिवशी ईशान्य मोसमी वळवाच्या मुसळधार पावसाने थैमान घातले. मेघगर्जना आणि विजेच्या कडकडाटसह झालेल्या पावसाने परिसरात सर्वत्रच पाणीच-पाणी झाले असून, वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे शेतांनाच ओढ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच, पाण्यामुळे शेतांचे बांध फुटून शेतातील माती पाण्याबरोबर वाहून गेली आहे. एकीकडे वरुणराजाच्या कृपेने पाण्याची चिंता दूर होऊ लागली असताना सततच्या पडणाऱ्या मोठ्या पावसाने शेतातील पिके पाण्यात जाऊन सडून वाया जाण्याची भीती शेतकरीवर्गात निर्माण होऊ लागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आनंदात कुठेतरी चिंतेचेही वातावरण पाहावयास मिळत आहे. खरीप हंगामात पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्याने हंगामातील पिकांचे पाण्याच्या तुटवड्याअभावी सिंचन करता न आल्याने उत्पादनात कमालीची घट उत्पादक शेतकऱ्यांना सहन करावी लागली. परिणामी, हंगामातील आर्थिक उत्पन्नही घटून शेतकऱ्यांच्या पदरी निराशा आली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या उत्पादनाच्या आशेवर शेतकरी भिस्त ठेवून होता. त्यातच रब्बी हंगामाच्या तोंडावर परतीच्या मुसळधार पावसाने सलग दहा-बारा दिवस कृपा करून शेतकऱ्यांची पाण्याची चिंता दूर केली. पाण्याची तरतूद झाल्याने शेतकरी आनंदाने शेतीच्या कामाला लागला आहे. रब्बी हंगामातील प्रमुख पीक अर्थात कांद्याच्या लागवडींना शेतकऱ्यांनी विशेष प्राध्यान्य देऊन त्या उरकविण्याचा जोर धरला आहे. गेल्या चार दिवसांपासून वातावरणातील उकाड्याचे पावसात रूपांतर होत असून, खेडसह शिरूर तालुक्याला मुसळधार पाऊस झोडपून काढत आहे. आज सकाळी-सकाळीच शिरूरच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस येऊ लागल्याने नागरिकांची दिवसाची सुरुवात पावसाने झाली. मात्र, सायंकाळी चारच्या सुमारास दक्षिण बाजूकडून आलेल्या काळेकुट्ट ढगांनी बरसण्यास सुरुवात केली अन् काही क्षणांतच सगळीकडे जलमय परिस्थिती तयार झाली. तब्बल दोन तासांहून अधिक वेळ झालेल्या मुसळधार पावसाने परिसरातील ओढ्या-नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आले असून, भीमा-भामा नदीतील पाण्याच्या पातळीत वाढ घडून आली आहे. (वार्ताहर)
सलग चौथ्या दिवशी धुवाधार
By admin | Published: October 05, 2015 1:50 AM