बिबवेवाडी : बिबवेवाडी भागातील अप्परमधील अंबिकानगर भागामध्ये सुमारे २० ते २५ गुंडांच्या टोळक्याने दहशत माजवत दिसेल त्याच्यावर हल्ला चढवत अनेक गाड्यांची तोडफोड केली. घरांवर दगडफेक करीत मोठे नुकसान केले. ही घटना मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली़ अंबिकानगरच्या एका गल्लीत गुंडांचा जवळपास अर्धा तास नंगा नाच सुरू होता़ अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे या भागात दहशतीचे वातावरण पसरले आहे.विकास जठार (वय २०), बाळू जोगदंड (वय ५५) अशी जखमींची नावे असून, त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़ विकास जठार हा रिक्षामध्ये बसला होता़ तितक्यात काही तरुण हातात कोयते, दगड घेऊन आले़ त्यांनी विकास याच्या डोक्यावर, हातावर कोयत्याने वार केले़ बाळू जोगदंड यांच्या हाताला दगड लागल्याने तेही जखमी झाले आहेत़ याविषयी अधिक माहिती अशी की, अप्पर भागामध्ये अज्ञात २० ते २५ युवकांचे टोळके रात्री साडेआठच्या सुमारास आले़ त्यांनी लांबवर आपल्या गाड्या लावल्या़ तेथून ते चालत अंबिकानगरमधील गल्लीत शिरले आणि तुफान दगडफेक करण्यास सुरुवात केली़ हातात हत्यारे घेऊन दिसेल त्यांच्यावर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. यामध्ये तीन नागरिक जखमी झाले आहेत. दोन दिवसांपूर्वी अंबिकानगर येथे राहणाऱ्या अमोल जोगदंड व अप्पर भागात राहणाऱ्या अक्षय लोखंडे यांच्यामध्ये भांडणे झाले होती. मात्र, स्थानिक राजकीय नेत्यांच्या मदतीने ही भांडणे मिटवण्यातदेखील आली होती. त्याच भांडणामुळे आजचा प्रकार घडला असावा, असा पोलिसांचा संशय आहे. घटनास्थळी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त मिलिंद मोहिते, पोलीस निरीक्षक दीपक निकम, सर्जेराव बाबर यांनी मोठ्या फौजफाट्यासह धाव घेतली. मात्र, तोपर्यंत सर्व आरोपी पसार झाले होते. या गुंडांनी भागातील सुमारे १२ हून अधिक गाड्या फोडल्या असून, अनेक घरांवर दगडफेक केलेली आहे. हे गुंड मोठमोठ्याने ओरडत दिसेल त्याला मारत होते. त्यांच्या हातात अनेक धारदार शस्त्रे होती. ते बहुतेक कुणाला तरी ठार मारण्याच्या उद्देशानेच आले होते, अशी माहिती स्थानिक नागरिकांनी दिली. या प्रकारामुळे भागात पुन्हा दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यापूर्वीही या भागात गाड्या फोडण्याचे काही प्रकार घडले आहेत.या भागात पोलीस चौकी व्हावी, तसेच बिबवेवाडी पोलीस स्टेशनला मंजूर असलेला पूर्ण स्टाफ तरी मिळावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे़
अंबिकानगरमध्ये धुडगूस
By admin | Published: January 20, 2016 1:32 AM