पुणे : आपल्या प्रतिभेतून अमर्याद शक्यतांना रंगमंचावर साकारणाऱ्या कथकसम्राज्ञी गुरू पं. रोहिणीताई भाटे यांच्या दुर्मिळ व अजरामर नृत्यरचनांची झलक शनिवारी (दि. १०) रसिकांनी अनुभवली. आषाढघनांनी गर्दी केलेली असतानाच बहारदार नृत्यजलधारांची सरीवर सर रसिकांना सुखावून गेली.
निमित्त होते, नृत्यभारती कथक डान्स ॲकॅडमीच्या अमृतमहोत्सवी दिनानिमित्त आयोजित केलेल्या ' स्मृतिगंध' या मैफिलीचे. नृत्यभारतीच्या फेसबुक पेजवर हा कार्यक्रम पार पडला.
रोहिणीताईंचे स्वत:चे नृत्य तसेच त्यांच्या काही विलक्षण कलाकृती व नृत्यरचनांचे दर्शन या माध्यमातून रसिकांना घडले. संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याचा पुन:प्रत्यय यातून रसिकांना नव्याने अनुभवता आला. या वेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते नृत्यभारतीच्या संकेतस्थळाचे लोकार्पण करण्यात आले. पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज यांच्यासह अनेक दिग्गज, मान्यवरांनी रोहिणीताई यांच्या स्मृतींना या वेळी उजाळा दिला.
या आभासी कार्यक्रमाची सुरुवात गणेशवंदनेने झाली. पारंपरिक तीनतालातील रचना, उठाण, थाट, परण यातून कथक नृत्याचे सौंदर्य रसिकांसमोर उलगडले. रोहिणीताईंच्या स्वतःच्या नृत्य आविष्कारासह त्यांच्या शिष्यांनी सादर केलेल्या काही नृत्यरचनांचा देखील यामध्ये समावेश होता. तालाची सूक्ष्म जाण आणि कथक साधनेची उंची याचे विलोभनीय दर्शन या सर्व सादरीकरणातून रसिकांना घडले. ज्येष्ठ शिष्या शरदिनी गोळे यांनी सादर केलेले 'प्रीती करी कहू, सुख ना लहयो ' हे भजन तर 'त्रिवेणी', 'वर्तमानगुप्ता नायिका', ' टाईम', ' मौन ' आदी नृत्यरचना यातून पदलालित्य, मोहक हावभाव याचा सुरेख मिलाफ भावला. 'ऐसे राम जगत हितकारी ' या रोहिणीताईंच्या गाजलेल्या भजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. रोहिणीताई भाटे यांच्या ज्येष्ठ शिष्या व संस्थेच्या संचालिका नीलिमाताई अध्ये यांनी कार्यक्रमाचे संयोजन व निवेदन केले.
------------------------------------------------------------------