पुणे :बांगलादेशातून बनावट नोटा आणून तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) अटक केली आहे. त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. ही कारवाई शुक्रवारी रात्री उशिरा खडकी बाजार परिसरात करण्यात आली.
बनावट नोटा चलनात आणणाऱ्या तीन आरोपींची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) पथकाला मिळाली होती. त्यानुसार पुणे प्रादेशिक युनिटच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून खडकी परिसरात एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून हिंदुस्थानी चलनातील ५०० रुपये मूल्याच्या ४०० नोटा जप्त करण्यात आल्या.
याप्रकरणी त्याला मदत करणाऱ्या आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे. तस्करीच्या बनावट हिंदुस्थानी चलनी नोटा (एफआयसीएन) बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. कारवाईत पुणे कस्टमच्या अधिकाऱ्यांसह डीआरआय पथकाने सहभाग घेतला होता.