पिंपरी : औषधे वाहतुकीच्या नावाखाली गोवा येथील बिअर व विदेशी मद्याची तस्करी उघडकीस आली. ‘राज्य उत्पादन शुल्क’च्या तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने कारवाई करून एका ट्रक चालकाला अटक केली. तसेच ६५ लाख ९० हजार १६० रुपयांचे मद्य जप्त केले. मावळ तालुक्यात सोमाटणे पथकर नाक्याजवळ ही कारवाई केली.
शंकरलाल नारायण जोशी (वय ४६, रा. बस्सी, ता. सलुंबर, जि. उदयपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. त्याच्यासह ओमपुरी नावाच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे मिळालेल्या माहितीनुसार, गोवा राज्यात निर्मिती केलेले आणि गोवा राज्यात विक्रीची परवानगी असलेले मद्य वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने शनिवारी सायंकाळी पाचच्या सुमारास सोमाटणे गावच्या हद्दीत, सोमाटणे पथकर नाक्याच्या परिसरात सापळा लावला. त्यावेळी संशयावरून एक कंटेनर ट्रक पथकाने अडवला. ट्रकची तपासणी केली असता औषधे वाहतूक करण्याच्या नावाखाली गोव्यातील मद्याची तस्करी होत असल्याचे उघडकीस आले. विविध ब्रँडचे विदेशी मद्याचे व बिअरचे एकूण ८४५ बॉक्स असा मुद्देमाल मिळून आला. गोवा राज्यात निर्मिती व विक्रीकरिता असलेले विविध प्रकारचे विदेशी मद्य व बिअर असा एकूण ६५ लाख ९० हजार १६० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. मद्य तसेच वाहनासह ८६ लाख १६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुण्यातील अधीक्षक चरणजितसिंग राजपूत, उपअधीक्षक युवराज शिंदे, तळेगाव दाभाडे येथील निरीक्षक संजय सराफ यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक दीपक सुपे, प्रियंका राठोड, सहायक दुय्यम निरीक्षक सागर धुर्वे, आर. सी. लोखंडे, जवान तात्याबा शिंदे, राहुल जौंजाळ, संजय गोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.