पुणे : मुंबईहून पुण्यात तस्करी करून बसने सोने आणले जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) पुणे कार्यालयाने तळेगाव टोल नाक्यावर बसला अडवले. तपासणी केली असता ४ कोटी ४७ लाखांचे तब्बल ६ किलो सोने सापडले असून, ते जप्त करण्यात आले आहे. तसेच चार आरोपींना सीमाशुल्क अधिनियम १९६२ च्या तरतुदींनुसार अटक केली आहे.
तपासादरम्यान, संशयित व्यक्तीच्या अंगझडतीत दोन पाउचमध्ये १६ अंड्यासारख्या आकाराच्या कॅप्सूलमध्ये सोन्याची तस्करी केली जात असलेली पेस्ट तपास पथकाला सापडली. पुढील कारवाईत पुरवठादार, त्याचा साथीदार यांना मुंबई आणि पुण्यातून अटक करण्यात आली. चौघांनी मिळून ते एक सुव्यवस्थित सोने तस्करी सिंडिकेट चालवत असल्याची कबुली दिली आहे. एकूण ५,९१८ ग्रॅम सोने (ज्याची किंमत ४.४७ कोटी आहे) आणि तस्करीतून मिळालेली २२ लाखांची रोकड देखील जप्त करण्यात आली. पुढील तपास सुरू आहे.