पुणे : बिबट्याच्या कातडीची तस्करी करण्यास आलेल्या आठ जणांना डुक्करखिंड परिसर आणि सासवड येथे सापळा रचून वन विभागाने अटक केली.
अनिकेत प्रमोद भोईटे (वय २०), संदीप शंकर लकडे (वय ३४, रा. फलटण), धनाजी नारायण काळे (वय ३५, रा. औरंगाबाद), आदेश शरदराव इंगोले (वय ४७, रा. बारामती), बाळू बापू नामदा (वय ६५, रा. कराड), आकाश अण्णासाहेब रायते (वय २७, रा. इंदापूर), उदयसिंह शंकरराव सावंत (वय ४७), अमोल रमेश वेदपाठक (वय ३४) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. भांबुर्डा वनपरिक्षेत्राच्या अधिकाऱ्यांना बिबट्याच्या कातडीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा केल्यानंतर तिघेजण वारजेत येणार असल्याचे समजताच वनविभागाने बनावट ग्राहक म्हणून त्यांच्याशी संपर्क केला. संपर्क साधल्यानंतर त्यांनी वारजेत बोलावले. त्याचदरम्यान, वनविभागाने या भागात सापळा रचला. आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणांचे पत्ते दिले. त्यानंतर त्यांना डुक्करखिंड परिसरात बोलविण्यात आले. तेथे गेल्यानंतर त्यांनी प्लास्टिकच्या पिशवीत बिबट्याचे कातडे आणल्याचे दिसून आले.
पथकाने छापा टाकत अनिकेत, संदीप व धनाजी या तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. चौकशीत बिबट्याचा व्यवहार सासवड येथे होणार असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी सासवड येथे सापळा रचून इतर आरोपींना बुधवारी (दि. १५) अटक केली. आता त्यांच्याकडे बिबट्याची शिकार कोणी व कोठे केली. तसेच, इतर कोणी आरोपी आहेत का, तर त्याच्या व्यवहाराबाबत चौकशी सुरू आहे. या गुन्ह्यांच्या पुढील तपासासाठी आरोपींना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकील विजयसिंह जाधव यांनी केली. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस. पाटील यांनी आरोपींस १६ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.
--------------------