या आठवड्यात चार ते पाच सर्पदंश झालेले रुग्ण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आले असता अनेक रुग्णांना वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याने मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. यापूर्वी अनेकदा सर्पदंश तसेच आदी रुग्णांना उपचार घेण्यासाठी आल्यानंतर वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने अनेकांना खाजगी रुग्णालयाची वाट धरावी लागली आहे. नुकतेच १४ सप्टेंबर रोजी निमगाव म्हाळुंगी येथील एका आठ वर्षीय बालिकेला सर्पदंश झालेला असताना तिला तळेगाव ढमढेरे प्राथमिक आरोग्य केंद्रात आणण्यात आले. येथे वैद्यकीय अधिकारीच उपलब्ध नसल्याचे दिसून आले. घटनेची माहिती मिळताच वन्य पशु-पक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे शिरुर तालुकाध्यक्ष श्रीकांत भाडळे, शेरखान शेख,शुभम वाघ,अमोल कुसाळकर यांनी तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेत पाहणी केली. त्या आठ वर्षीय बालिकेला विषारी सापाचा दंश झाला असल्याचे निदर्शनास आले. यावेळी चक्क सर्पमित्रांनी त्या बालिकेवर येथील आरोग्य सेविका रुपाली मोरे यांच्या मदतीने प्राथमिक उपचार केले. मात्र येथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने पुणे जिल्हा परिषद सदस्या रेखा बांदल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शिरुर तालुका उपाध्यक्ष तेजस यादव यांनी शिरुर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दामोदर मोरे यांना माहिती देत रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्या बालिकेला पुणे येथील ससून रुग्णालयात हलविले. अखेर बालिकेचा जीव वाचला आहे.
तळेगाव ढमढेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अनेक दिवसांपासून वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना रात्री अपरात्री मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याबाबत जिल्हा वैद्यकीय अधिकारी तसेच तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्याशी बोलणे झालेले असून आठ दिवसात येथे वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली नाही तर, वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार घालून आंदोलन केले जाईल.
-तेजस यादव
उपाध्यक्ष,महाराष्ट्र नवनिर्माण सेना,शिरुर तालुका
तळेगाव ढमढेरे ता. शिरुर येथे डॉक्टर अभावी सर्पदंश झालेल्या बालिकेवर प्राथमिक उपचार करताना.
150921\1640-img-20210915-wa0094.jpg
तळेगाव ढमढेरे येथे सर्पदंश झालेल्या बालिकेवर उपचार करताना सर्पमित्र व आरोग्य कर्मचारी