महाड : केरळमधील पूरपरिस्थिती ओसरल्यानंतर नागरी वस्तीमध्ये आलेल्या सर्पांना सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी महाडमधून गेलेल्या सात जणांच्या पथकाने एर्नाकुलम, कोडानाड आणि चानाकुडी या भागात स्नेक रेस्क्यू आॅपरेशन सुरू केले आहे. या पथकाने नागरी वस्तीत शिरलेल्या सुमारे २० सापांना सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम पूर्ण केले आहे. केरळ वनविभागाच्या सहकार्याने सर्पमित्रांनी ही मोहीम राबवली आहे.
वाइल्ड लाइफ ट्रस्ट आॅफ इंडियाचे जोस लुईस यांनी महाड येथील सिस्केप आणि आउल्स या संस्थेच्या सदस्यांना या रेस्क्यू आॅपरेशनसाठी पाचारण केल्यानंतर चार दिवसांपूर्वी चिंतन वैष्णव, प्रणव कुलकर्णी, चिराग मेहता, योगेश गुरव (सर्व महाड), नितीन कदम, ओंकार वरणकर (दोघेही बिरवाडी) आणि कुणाल साळुंखे (रोहा) हे सात जण केरळ येथे गेले आहेत. केरळमध्ये हे सातही जण तीन वेगवेगळ्या गटामध्ये विभागले गेले आहेत. चिंतन वैष्णव आणि प्रणव कुलकर्णी हे दोघे एर्नाकुलम येथे, कुणाल साळुंखे, योगेश गुरव आणि नितीन कदम हे कोडानाड येथे, तर चिराग मेहता आणि ओंकार वरणकर हे चानाकुडी येथे कार्यरत आहेत. केरळच्या वनविभागाने या तीनही टीमला एक वाहन आणि त्यांच्यासमवेत एक वन अधिकारी उपलब्ध करून दिला आहे. सरकारने नागरी वस्तीमध्ये, घरांमध्ये शिरलेल्या सापांची माहिती देण्यासाठी एक हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनवर कॉल आल्यानंतर या टीमचे सदस्य तत्काळ त्या ठिकाणी पोहोचून त्या सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडण्याचे काम करीत आहेत. आतापर्यंत या टीमने सुमारे २० सापांची सुरक्षित मुक्तता केली असून, त्यामध्ये नाग, अजगर, त्याचप्रमाणे अन्य काही विषारी सापांचाही समावेश आहे.जसजसा घरांमधील, सार्वजनिक ठिकाणांवरील चिखल साफ होत आहे, तसतसे साप मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत, त्यामुळे येत्या दोन-तीन दिवसांत ही मोहिम अधिक गतिमान होणार असल्याची माहिती चिंतन वैष्णव आणि योगेश गुरव यांनी दिली.च्नागरी वस्तीमध्ये, घरांमध्ये शिरलेल्या सापांची माहिती देण्यासाठी एक हेल्पलाइन सुरू केली आहे. या हेल्पलाइनवर कॉल आल्यानंतर टीमचे सदस्य सापाला पकडून सुरक्षित ठिकाणी सोडतात.