साप दिसल्यास अंतर ठेवा, सापांना डिवचले तरच चावतात; अन्यथा धोका नाही; सर्पतज्ज्ञांचा सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पावसाळ्यातील ऊन-पाऊस हा वातावरणीय बदल सापांना फारसा सहन होत नाही. साप हे शीतरक्ताचे असल्याने मोकळ्या हवेत फिरण्यासाठी ते बिळातून बाहेर पडतात. जिल्ह्यासह पश्चिम घाटाच्या परिसरात विषारी सापाच्या नाग, घोणस, मण्यार, फुरसे या चार प्रमुख प्रजाती, तर बिनविषारी सापाच्या नऊ ते दहा प्रजाती आढळतात. या काळात कुणालाही साप दिसला तरी त्याला डिवचू नका किंवा काठ्या, दगडे मारू नका. केवळ त्यांच्यापासून अंतर ठेवा. साप विनाकारण चावत नाही; गर्दी केली तर ते बिथरतात आणि हल्ला करतात. अन्यथा सापांपासून कोणताही धोका नसल्याचा सल्ला सर्पमित्र आणि सर्पतज्ज्ञांनी दिला आहे.
दर वर्षी पावसाळा सुरू झाला की मानवीवस्त्यांमध्ये साप सापडण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे सापांना मारण्याच्या आणि सर्पदंशाच्या घटना देखील वाढीस लागतात. ‘चामखेळ्या बेडूक’ हे सापांचे आवडते खाद्य असल्याने पावसाळी हंगामामध्ये ते सापांना उपलब्ध होऊ शकते. जितके हे बेडूक खायला मिळतील तितके सापांना हवे असते. त्यातून वर्षभर शरीरात ते फॅटस तयार करून ठेवतात. या बेडकांसाठी सापांची धावपळ सुरू असते. याशिवाय पावसाळी हंगाम हा बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. यातच उंदीर हे सापाचे शत्रू असतात. उंदरांच्या वासाने बहुतांश वेळेला साप त्यांच्यामागे जातात. घरात अन्न साठल्याने उंदीर घरात प्रवेश करतात आणि त्यांच्यामागोमाग सापदेखील घरात येतात. त्यामुळे पावसाळ्यात साप दिसण्याचे प्रमाण वाढते. कुणाच्या घरात, अंगणात किंवा अडगळीच्या खोलीमध्ये साप सापडू शकतात. मात्र. सर्व साप हे विषारी असतातच असे नाही. साप आपणहून कधी कुणाला चावत नाहीत. जेव्हा तुम्ही त्याला त्रास देता किंवा त्याच्या अंगावर चुकून पाय देता अथवा काठ्यांनी मारता तेव्हाच साप चावतो. सर्वांनी सर्पमित्र व्हा, असे आवाहन सर्पतज्ज्ञ डॉ. नीलमकुमार खैरे यांनी केले आहे.
--------------------------------------------------------------
सर्प दंश झाल्यास काय करावे?
सर्पदंश झालेल्या रुग्णावर कोणतेही प्रयोग करत बसू नये. डॉक्टरी सल्ल्यानेच उपचार करावेत. प्रथम जखम स्वच्छ धुवावी. साप चावला असल्यास आवळपट्टी न बांधता रुंद क्रेप बँडेज दंश झालेल्या अवयवास बांधावे. बँडेज उपलब्ध नसल्यास कापडाचे ४ इंच रुंदीचे पट्टे वापरावेत. दंश झालेला भाग स्थिर ठेवावा. डॉक्टरांकडे पोहोचेपर्यंत बँडेज काढू नये, असे सर्पतज्ज्ञ डॉ. नीलमकुमार खैरे यांनी सांगितले.
----------------------------------------------
साप दिसल्यास गर्दी करू नका. सापासाठी गर्दी ही घातक असते. गर्दी झाल्यानंतर तो अस्वस्थ होतो. मग स्वत:च्या रक्षणासाठी तो चावतो. सापाच्या जवळ गेलो की ते आक्रमक होतात. पावसाळा हा सापांच्या प्रजननाचा काळ असतो. मादीसमवेत असंख्य नर साप असतात. एकाच ठिकाणी इतके साप आढळ्ल्याने त्यांना मारण्याचे प्रमाण वाढते. पण सापांना मारू नका. जवळच्या सर्पमित्रांशी संपर्क साधावा.
- गणेश माने, सर्पमित्र, पाषण
------------------------------------------------------------------------------------------
जिल्ह्यात सापडणारे विषारी साप -
नाग, घोणस, मण्यार, फुरसे, चापडा
---------------------------
बिनविषारी साप -
तस्कर, कवड्या, धामण, गवत्या, दिवड, कुकरी, मांडूळ, डूरक्या घोणस, धुळनागिन
------------------------------------------------------------------------------------------------------------------