पुणे - राज्य वन्यजीव मंडळातर्फे राज्याचे निसर्ग मानचिन्ह म्हणून राज्य सर्प, राज्य कोळी घोषित करण्यात येणार आहेत. त्यासाठी एक समिती नियुक्त केली असून, त्याची बैठक नुकतीच वन भवन येथे झाली. राज्याचे निसर्ग मानचिन्ह किती असावी याचाही सर्वंकष विचार होणे गरजेचे असून, त्यावर ही समिती काम करणार आहे.
सध्या राज्य सर्प आणि राज्य कोळीचे प्रस्ताव आलेले आहेत. त्यावर विचार करण्यात येत आहे. समितीमध्ये अध्यक्षस्थानी अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये, सदस्यांमध्ये मुख्य वनसंरक्षक रवींद्र वानखेडे, डॉ. रविकिरण गोवेकर, अशोक कॅप्टन, डॅा. वरद गिरी, रमेश कुमार, डॅा. सचिन पुणेकर आणि झुलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे प्रतिनिधी, बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे प्रतिनिधी आहेत.
ही समिती राज्यात किती निसर्ग मानचिन्हे असावीत, कोणत्या आधारवर ठरवावीत त्याचे निकष करणार, राज्य कोळी घोषित करण्यासाठी संबंधित प्रजातीचे परिसंस्थेतील महत्त्व जाणणार, सर्प प्रजातीचे परिसंस्थेतील महत्त्व जाणून संवर्धनाच्या दृष्टीने मूल्यमापन करणार, राज्य कोळी व राज्य सर्प याबाबतचे महत्त्व त्यांच्या कारणांसह समर्थन करून अहवाल सादर करण्यात येणार आहे.
———————————-
राज्याची मानचिन्हे असावीत यासाठी बायोस्फिअर्स संस्थेकडून काही वर्षांपुर्वी पुणे जिल्ह्यात उपक्रम घेतला होता. त्यात काही नावे काढण्यात आली होती. तो प्रस्ताव तेव्हा राज्य जैवविविधता मंडळाकडे पाठविला होता. त्यानंतर आता वन विभागाकडून मानचिन्हे घोषित करण्यासाठी समिती स्थापन केली असून, त्याबाबत कार्य होत आहे.
- डॅा. सचिन पुणेकर, संस्थापक, बायोस्फिअर्स संस्था
-------------------------