मंचर (पुणे) :शरद पवार यांनी नेहमीच तळ्यात मळ्यात अशीच भूमिका घेतली आहे. भाजपबरोबर अनेक वेळा जाण्याचे ठरवले. मात्र अचानक माघार घेतली. शेवटी अजित पवार यांनी तळ्यात राहण्याऐवजी मळ्यात राहण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही सरकारमध्ये सामील झालो असे प्रतिपादन राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
मंचर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भुजबळ यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी भुजबळ यांचा सत्कार केला. ते म्हणाले, आता लोक हळूहळू बोलू लागले आहेत. मला सुद्धा ज्या गोष्टी माहीत नव्हत्या त्या या आठवड्यात समजल्या. लोकांना हेच आश्चर्य वाटते की वळसे पाटील अजित पवार सोबत का गेले? कारणे काहीतरी असतीलच. ती त्यांनी सांगण्यास सुरुवात केली आहे. मनुष्य एकदा थांबेल दोनदा थांबेल, ऐकून घेईल मात्र ऐकून घेऊन कसेही थांबेल असे नाही.
पवार यांनी सांगितले बस की बस उठ की उठ असे आम्ही वागत होतो. शरद पवार यांनी अनेक वेळा भाजपबरोबर जाण्याचे ठरवले. आता सुद्धा सात-आठ महिने चर्चा सुरू होती. चर्चेत मी नव्हतो. मात्र पवार, प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील हे नेते होते. एकाच रस्त्याने गेले पाहिजे. मात्र पवार यांनी नेहमीच तळ्यात मळ्यात अशीच भूमिका घेतली. शेवटी अजित पवार यांनी तळ्यात राहण्याऐवजी मळ्यात राहण्याचा निर्णय केला घेतला आहे. त्यानुसार सत्तेत सहभागी झालो, असं भुजबळ म्हणाले.
वळसे पाटील यांच्या बद्दल गौरवोद्गार काढताना भुजबळ म्हणाले, अतिशय शांत, मृदुभाषी, अतिशय अभ्यासू, लोकांची कामे करणारे हे नेतृत्व आहे. जनतेचे त्यांच्या अतिप्रेम आहे. एकत्र राहून सर्वच प्रश्न सोडवण्याची पराकाष्टा करू असे ते म्हणाले. कांदा प्रश्नावर मीच लढलो आहे. अधिवेशनात उभे राहिलो की कांदे कांदे अशा घोषणा व्हायच्या. तरीही मी हा प्रश्न सोडला नाही. कांदा प्रश्नाच्या अडचणी सोडवू अशी ग्वाही त्यांनी दिली.
यावेळी भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष ॲड. प्रदीप वळसे पाटील, बाजार समितीचे उपसभापती सचिन पानसरे, संचालक राजेंद्र भंडारी, लक्ष्मण बाणखेले, अरविंद वळसे पाटील, निलेश शेळके आदी उपस्थित होते. नितीन थोरात यांनी स्वागत केले. संचालक निलेश थोरात यांनी सूत्रसंचालन, तर शरद बँकेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांनी आभार मानले.