बारामती: दिल्ली भेटीच्या वेळी नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंशी बंद खोलीत चर्चा केली. त्यामुळे अजित पवारांची मानसिकता बिघडली आहे. ते तणावात असल्यासारखे वाटत असल्याचा टोला आमदार गोपिचंद पडळकर यांनी बारामती येथे पत्रकारांशी बोलताना लगावला.
गोपीचंद पडळकर यांनी शनिवारी(दि १९) बारामती तालुक्यात विविध समाजातील प्रतिनिधींबरोबर घोंगडी बैठका घेतल्या. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी अजित पवारांवर टीका केली.
पडळकर म्हणाले,अजित पवार यांना मी आवाहन करतो. बारामतीकरांनी मागील विधानसभेला माझे डिपॉझिट जप्त केले, हा विषय शिळा झाला. स्वत:च्या जिल्ह्यात अजित पवार यांचा मुलगा लोकसभेला दीड, दोन लाखाने पराभूत झाला. निवडणुकीआधी अवघ्या १५ दिवसांपूर्वी पक्षाने मला बारामतीतून लढण्यास सांगितले. पवार यांनी निवडणुकीच्या आधी १५ दिवस आधी फॉर्म भरून अजित पवारांच्यात हिम्मत असेल तर आटपाडीमधून स्थानिक नेत्यांचा पाठिंबा न घेता लढवावी. तर माझ्यासारखीच अवस्था त्यांची होईल.माझा पराभव त्याचवेळी मी मान्य केला आहे. त्याच विषयांवर पवार यांनी बोलु नये. ते तणावात असल्यासारखे वाटतात.मराठा, ओबीसी आरक्षण, पदोन्नतीतील आरक्षण याविषयावर त्यांनी बोलावे.
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे काही गोष्टी राजकारणात घडल्या. राज्य सरकारचंच सामाजिक सलोखा बिघडेल अस वर्तन सुरु आहे.जातीजातीत तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज्य सरकारच्या माध्यमातुन विविधमंत्रांच्या स्टेटमेंट मधून होत आहे.मराठा समाजाच आरक्षण रद्द करण्याच्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबाबत राज्य शासन गंभीर नाहि.ओबीसी राज़किय आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली आहे.त्या ओबीसी ३४६ जातींच्या राजकीय प्रतिनिधीत्वाचा प्रश्न निर्माण झाल्याचे पडळकर म्हणाले.
७ मे रोजी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील उपसमितीने २००४ च्या पदोन्नतीच्या कायद्याला स्थगिती दिली. पदोन्नती विषयी आला तेव्हा काँग्रेसने राजीनाम्याची भूमिका घेतली,त्यांना मी आवाहन करत आहे. तुम्ही केलेली मागणी केली त्याला केराची टोपली दाखवली.
काका पुतण्यांच्या पुढं माना डोलावणे कमी कमी करा.सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्राची देखील राज्य सरकारने दखल घेतली नाही. महाराष्ट्रतील काँग्रेसचे मंत्री सत्तेपोटी लाचार झालेत, वसुलीचा जो हिस्सा मिळतोय त्यावर ते समाधानी आहेत. यांचं कुणी ऐकत नाही जर त्यांच्यात हिम्मत असेल तर राजीनामा द्यावा.ओबीसी आरक्षण,पदोन्नती आरक्षण,मराठा आरक्षणावर त्यांनी मुग गिळुन बप्प बसु नये. सरकारमध्ये चर्चा नाही, समन्वय नाही. वसुलीसाठी, खाबुगिरीसाठी सरकार चालवितात. मुख्यमंत्री कमी बोलतात आणि बाजूचे लोक जास्त बोलतात अशी टीका पडळकर यांनी केली.