...म्हणून बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी: खासदार अमोल कोल्हेंनी घेतली पशुसंवर्धन मंत्र्यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: February 11, 2021 05:08 PM2021-02-11T17:08:53+5:302021-02-11T17:10:16+5:30
संरक्षित प्राण्यांच्या यादीतून 'बैल' हा प्राणी वगळावा, अशीही मागणी केली.
पुणे : शिरूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक लढविताना डॉ. अमोल कोल्हे यांनी बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु करण्याबाबत शब्द दिला होता. त्याच दृष्टीने बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू करावी या हेतूने आत्तापर्यंत कोल्हे प्रयत्न करताना दिसत आहे. खिलार जातीच्या देशी बैलांचा वंश वाचवण्यासाठी बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून 'बैल' हा प्राणी वगळावा, अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी बुधवारी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडे केली.
बैलगाडा शर्यती पुन्हा सुरू करण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी बुधवारी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांची भेट घेऊन निवेदन दिले. बैलगाडा शर्यती बंद झाल्यापासून सातत्याने खिलार जातीच्या देशी बैलांची संख्या कमी होत असून १९९७ पासून २०१८ पर्यंत जवळपास बैलांची संख्या २२ टक्क्यांनी कमी झाली आहे. तर २०१९ ही संख्या २९.६३ इतकी कमी झाली असून सोळावी पशुगणना ते १९ वी पशुगणना या काळात ४५.६७ टक्क्यांनी बैलांची संख्या कमी झाली असल्याकडे केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री गिरीराज सिंह यांचे लक्ष वेधले. वाघ, सिंह, अस्वल, माकड या संरक्षित जंगली प्राण्यांच्या यादीत पाळीव प्राणी असलेल्या 'बैल' प्राण्याचा समावेश झाल्यामुळे देशी खिलार जातीच्या बैलांचा वंश नष्ट होण्याच्या मार्गावर असल्याचे खासदार डॉ. कोल्हे यांनी निदर्शनास आणताच गिरीराज सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल असल्याचे सांगण्यात आल्याने आपण निर्णय घेतला नाही, अशी कबुली दिली.
'बैल' प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्यासाठी आपण मांडलेले मुद्दे श्री. गिरीराज सिंह यांनी आपुलकीने समजून घेतले. त्याचबरोबर बैलगाडा शर्यती बंद झाल्यामुळे ग्रामीण अर्थकारणावर विपरीत परिणाम झाला असून बारा बलुतेदारांचा व्यवसाय ठप्प झाल्याने व्यापार पूर्णतः थांबला आहे. याकडे आपण गिरिराज सिंह यांच्याकडे लक्ष वेधल्याचे सांगून खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, 'बैल' हा प्राणी संरक्षित प्राण्यांच्या यादीतून वगळण्याबाबत गिरीराज सिंह यांनी सकारात्मकता दर्शवली. तसेच या संदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन त्यांनी दिले असून गुरुवारी ही बैठक होण्याची शक्यता असल्याचे डॉ. कोल्हे म्हणाले. या भेटीत श्री. गिरीराज सिंह यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेत भाग घेताना डॉ. कोल्हे यांनी केलेल्या आक्रमक व मुद्देसूद भाषणाचं कौतुक केले.
बैल या प्राण्याचा संरक्षित प्राण्यांच्या यादीतील समावेश वगळण्याबद्दल काल मान. गिरीराज सिंहजी यांना निवेदन दिले होते. त्यासंदर्भात संबंधित खात्याचे Joint Secretary ओ. पी. चौधरी यांच्यासोबत गुरुवारी मंत्रिमंहोदयांच्या उपस्थितीत बैठक झाली. बैलगाडा शर्यत पुन्हा सुरु होण्याच्या दृष्टीने सर्वोपतरी सहकार्य करण्याची मंत्री महोदयांची भूमिका पाहून समाधान वाटले.