पुणे: शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत चालले असताना एखाद्या इमारतीमध्ये पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास इमारत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात येणार आहे. तर तीन, चार इमारती असणाऱ्या एखाद्या हाऊसिंग सोसायटीमध्ये वीस पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास ती सोसायटी प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे.
मागील दोन आठवड्यापासून कोरोना पुन्हा वर तोंड काढू लागला आहे. जानेवारी महिण्यात एका दिवसात १०० ते २०० रुग्ण आढळत होते. तीच आकडेवारी सद्यस्थितीत ५०० च्या पुढे गेली आहे. यावरून पुणे महानगरपालिकेने रात्रीची संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु रुग्णसंख्येत घट होताना दिसत नाहीये. या कारणास्तव शहरात सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र जाहीर करण्यात आले आहेत.काल एका दिवसात ९०० रुग्ण आढळले असून पुण्याने त्यात उच्चांक गाठला आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने पालिकेक डून उपाययोजना सुरु करण्यात आल्या आहेत. रुग्ण आढळून प्रमाण अधिक असलेल्या शहरातील 42 भाग ‘सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र’ घोषित करण्यात आले आहेत. ज्या पालिकेच्या 15 पैकी दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही क्षेत्र असून पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकही क्षेत्र नाही.