पुणे : माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीला बिनशर्त दिलेला पाठिंबा नाकारण्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. फेसबुकवर पोस्ट लिहीत त्यांनी पाठिंबा नाकारल्याचे कारण सांगितले आहे. पाच वर्षे सातत्याने घेतलेली, मोदी शाहविरुद्धच्या ठाम भूमिकेला, जी वंचित आघाडी तडा देत आहे, याची खात्री झाल्यावर पाठिंबा नाकारल्याचे कोळसे-पाटील यांनी स्पष्ट केले आहे.वंचित बहुजन आघाडीला माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी बिनशर्त पाठिंबा दिला होता. औरंगाबादच्या जागेवर कोळसे-पाटील यांना या आघाडीकडून उमेदवारी देणाची चर्चाही मधल्या काळात सुरू होत्या. काही दिवसांपूर्वी अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसशी आघाडीचे सर्व पर्याय बंद झाल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर वंचित बहुजनआघाडीने ३७ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. औरंगाबादमधून एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.कोळसे-पाटील म्हणतात, ‘वंचित बहुजन आघाडीला दिलेला बिनशर्त पाठिंबा नाकारला आहे. काँग्रेस हा एकमेव पक्ष जो जातीयवादी, विषारी विचारांच्या संघप्रणित भाजपाला रोखू शकतो, त्यांच्याबरोबर आघाडीसाठी शेवटचा पण अनेक अयशस्वी प्रयत्नांपैकी एक शेवटचा प्रयत्न केला. मी गेली पाच वर्षे सातत्याने घेतलेली, खुनी मोदी शाहविरुद्धच्या ठाम भूमिकेला, जी वंचित आघाडी तडा देत आहे, याची खात्री झाल्यांवर त्यांचा दिलेला पाठिंबा नाकारलेला आहे. तसं त्यांनी मला सुरुवातीपासूनच, अनेकदा काँग्रेसबरोबर चर्चा करण्याचे कबूलही केलं होतं व मी स्वखुशीने ती मध्यस्थी कालपर्यंत करीतही होतो. परंतु अॅड. बाळासाहेबांनी सर्व उमेदवार जाहीर करून चर्चेला पूर्णविराम दिलेला आहे. त्यामुळे माझ्या हातून कळत नकळतदेखील चूक होऊन मोदीला मदत होता कामा नये, हाच प्रयत्न आहे.’
...म्हणून मी वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा नाकारला - कोळसे-पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 3:28 AM