... म्हणून मी शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण कार्यक्रमास जाणे रद्द केलंय; डॉ. कोल्हेंचा व्हिडिओ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2023 02:51 PM2023-03-04T14:51:31+5:302023-03-04T15:03:08+5:30
महाराष्ट्रातील कोणत्याही गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा असतोच आणि नसेल तर त्याठिकाणी पुतळा प्रतिष्ठापना केला जातो.
पुणे - बेळगावमधील राजहंसगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. सुळगे-येळ्ळूर ग्राम पंचायतमध्ये पुतळा बसविण्याचा ठराव बहुमताने संमत झाला. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या पीडीओंनीदेखील मंजुरी दिली. त्यानंतर, आता येथील शिवछत्रपतींच्या पुतळ्याचं अनावरण कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याहस्ते २ मार्च रोजी संपन्न झाले. मात्र, ५ मार्च रोजी या पुतळा अनावरणाचा आणखी एक कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमास अभिनेता आणि खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं. मात्र, आपण या कार्यक्रमास जाणारी नाही, कार्यक्रमाला जाण्याचे रद्द केल्याचं खासदार कोल्हे यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर करत स्पष्ट केलं आहे. तसेच, यामागचे कारणही त्यांनी सांगितलंय.
महाराष्ट्रातील कोणत्याही गडावर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराजांचा पुतळा असतोच आणि नसेल तर त्याठिकाणी पुतळा प्रतिष्ठापना केला जातो. या दोघांही राजांनी एक वेगळा इतिहास निर्माण केला आहे. राजहंसगडाचा विकास करण्याचे काम हाती घेण्यात आले. त्यानंतर, त्याठिकाणी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. आता, या पुतळ्याजवळ ५ मार्च रोजी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या उपस्थितीत मोठा अनावरण सोहळा होत असून राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास मी तमाम सीमावासीय मराठी बांधवांच्या भावनांचा आदर करून उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतल्याचे अमोल कोल्हे यांनी सांगितले. मी सदैव सीमावासीय मराठी बांधवांसोबत सोबत होतो, आहे व राहीन, असा विश्वासही खासदारांनी व्यक्त केला.
बेळगाव येथील राजहंसगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमास मी तमाम सीमावासीय मराठी बांधवांच्या भावनांचा आदर करून उपस्थित न राहण्याचा निर्णय घेतला आहे.
— Dr.Amol Kolhe (@kolhe_amol) March 4, 2023
मी सदैव सीमावासीय मराठी बांधवांसोबत सोबत होतो, आहे व राहीन!#बेळगाव#मराठी#महाराष्ट्र#जय_शिवरायpic.twitter.com/FTBG9BPi9t
माझ्या अनेक सीमाभागातील बांधवांनी माझ्या हितचिंतकांनी सीमाभागातील या पुतळा अनावरण सोहळ्याच्या पार्श्वभूमीची कल्पना करुन दिली. या कार्यक्रमाच्या प्रमोशनासाठी माझ्याकडून काही चुकीचा उल्लेख झाला, त्याबद्दल मी दिलगीरीही व्यक्त केलीय. पण, माझ्या सीमाबांधवासोबत मी ठामपणे उभा आहे, आणि त्यांच्या आग्रही मागणीवरुन ५ मार्च रोजी बेळगावच्या राजहंसगडावर होणाऱ्या कार्यक्रमाला मी येण्याचं रद्द करतोय. मी तुमच्या न्याय मागण्यांसोबत कायम उभा आहे, विश्वास बाळगा, असेही अमोल कोल्हेंनी व्हिडिओतून स्पष्ट केलंय.