पुणे : पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी जोपर्यत गुन्हा दाखल होणार नाही, तोवर लढा सुरू ठेवला जाणार आहे. सर्वसामान्य व्यक्तीवर लगेच गुन्हा दाखल केला जातो, मात्र मंत्र्यांवर गुन्हा दाखल होत नाही, हे दुर्दैव आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असून संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार आहे, अशी माहिती पूजा चव्हाणची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी दिली आहे.
पूजाची चुलत आजी शांताबाई राठोड यांनी सोमवारी (दि. १) पोलीस आयुक्तांची भेट घेतली. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद रोखठोक भूमिका मांडली. राठोड म्हणाल्या, पूजाचे आणि माझे चांगले नाते होते. तिला जोवर न्याय मिळणार नाही तोवर लढा दिला जाणार आहे. पाच कोटी रुपये दिल्याचा पुरावा योग्यवेळी नावासह देणार आहे. परळीतील सीसीटीव्ही मिळावे यासाठी अर्ज दिला आहे. अरुण राठोड हा माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे. पूजाचे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणूनच मी तृप्ती देसाई यांची मदत घेतली आहे.
पूजाच्या आईवडिलांना शिवसेनेचे नेते व माजी मंत्री राठोड यांनी पाच कोटी रुपये दिलेले आहेत. म्हणून तिच्या त्यांचे तोंड बंद आहे, असा गंभीर आरोप शांताबाई यांनी केला. पूजाच्या आईवडिलांना संजय राठोडवर गुन्हा दाखल होऊ द्यायचा नाही. म्हणूनच ते मुख्यमंत्र्यांना भेटायला गेले. पोलिसांना सगळे माहिती असताना गुन्हा दाखल होत नाही. पूजा आठ दिवसांपूर्वी पुण्यात आली होती. जे काही असेल ते सत्य तपासात समोर यायलाच हवे, असेही त्या यावेळी म्हणाल्या.
पूजाचे आई- वडील अत्यंत दबावाखाली आहेत. या प्रकरणी सीबीआय चौकशी व्हावी अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री आई वडिलांना भेटले. तसे त्यांनी शांताबाई राठोड यांनाही भेट दिली पाहिजे. आम्हाला भेटायचे नव्हते म्हणून वरिष्ठ पोलीस आयुक्तांनी मीटिंग असल्याचे सांगितले. आणि आमची भेट नाकारली. परळीत कोणत्या कोणत्या गाड्या आल्या याची माहिती समोर यायला हवी. चार पाच दिवसांत मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहोत.
- तृप्ती देसाई, भूमाता ब्रिगेड