- श्रीकिशन काळे
पुणे : शहरात एक-दोन किलोमीटरवर तापमानात चढ-उतार दिसत आहे. त्याला अनेक कारणे आहेत. गेल्या आठवड्यात कोरेगाव पार्कमध्ये सर्वाधिक ४२ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. त्यामुळे कोरेगाव पार्क शहरातील सर्वांत ‘हॉट’ ठिकाण ठरत आहे. तिथे झाडी असली तरी शहरीकरण वाढलेय, बांधकामे, वाहनांची गर्दी आदी कारणांमुळे तेथील तापमान वाढत असल्याचे निरीक्षण भारतीय हवामानशास्त्र विभागाचे अतिरिक्त महासंचालक व हवामानशास्त्रज्ञ डॉ. कृष्णानंद होसळीकर यांनी नोंदविले आहे.
गेल्या आठवड्यात शहरातील तापमानाचा पारा ४२ अंश सेल्सिअसवर गेला होता. तापमानाची ही नोंद कोरेगाव पार्क येथे घेण्यात आली होती. त्याखालोखाल मगरपट्टा येथे सर्वाधिक ४०-४१ अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले होते. हवामानशास्त्र विभागाने शहरात ठिकठिकाणी अॅटोमॅटिक वेदर स्टेशन बसविले आहेत. त्यामध्ये कोरेगाव पार्कचाही समावेश आहे. हे स्टेशन पूना ब्लाइंड स्कूलच्या मोकळ्या आवारात आहे. तेथे दैनंदिन तापमानाची नोंद तसेच पर्जन्यमान मोजले जाते.
वेदर स्टेशनसाठी कसे निवडले जाते ठिकाण?
याविषयी डॉ. होसळीकर म्हणाले, वेदर स्टेशन लावताना तिथे हवामानाची परिस्थिती सर्वसाधारण असायला हवी. एखाद्या ठिकाणी औद्योगिक वसाहत असेल तर तिथे लावलेल्या वेदर स्टेशनवर सातत्याने तापमानाची नोंद अधिकच नोंदवली जाईल. याचा अर्थ त्या परिसराचे तापमान खूप आहे, असा अर्थ लावता येत नाही. स्टेशन लावताना आजूबाजूचा त्यावर परिणाम होईल अशी स्थिती नसावी, तरच योग्य तापमान नोंदविले जाते.
एखाद्या भागात तापमान अधिक असेल आणि इतर भागात दोन-तीन अंशाने ते कमी असेल तर त्या भागातील भौगोलिक रचना, परिसरातील लोकांची गर्दी, वाहनांची गर्दी, बांधकामे आदी गोष्टींचा परिणाम त्यावर होत असतो. ऑटोमेटिक वेदर स्टेशनच्या परिसरात सतत कचरा जाळला जात असेल किंवा गरम हवा सोडणारे कारखाने असतील, तर त्या ठिकाणच्या स्टेशनवर तापमान जास्तच दाखविले जाईल. त्यामुळे स्टेशनसाठी योग्य जागेची निवड होणे अत्यावश्यक असते.
- डॉ. कृष्णानंद होसळीकर, अतिरिक्त महासंचालक, भारतीय हवामानशास्त्र विभाग
काेरेगाव पार्कचे किमान व कमाल तापमान
दि. २० एप्रिल : २५.५ : ४२.३
दि. २१ एप्रिल : २२.८ : ३९.०
दि. २२ एप्रिल : २१.७ : ३६.५
दि. २३ एप्रिल : २२.० : ३८.३
दि. २४ एप्रिल : २३.१ : ३७.०
योग्य जागी स्टेशन
कोरेगाव पार्क येथील पूना ब्लाइंड स्कूलच्या आवारात हवामानशास्त्र विभागाने ऑटोमॅटिक वेदर स्टेशन उभे केले आहे. तिथून किमान व कमाल तापमानाची नोंद होते. मोकळ्या जागेमध्ये व आजूबाजूला झाडे आहेत. तिथे योग्य जागा असल्याने स्टेशन उभारले आहे.