पुणे : मानाची गणपतींची मिरवणुक सकाळी ७ वाजता सुरु करा नाही तर आम्हाला सकाळी मिरवणुक काढायला परवानगी द्या, अशी मागणी लक्ष्मी रोडने विसर्जन मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या मंडळांनी पोलिसांकडे केली आहे़. त्यामुळे यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत पेच निर्माण झाला आहे़. याबाबत मानाच्या पाच मंडळांची बैठक आज रात्री होणार असून त्यात त्यांची भूमिका ठरविणार आहेत़. विसर्जन मिरवणुकीत लक्ष्मी रोडवरुन जाणाऱ्या गणेश मंडळांची बैठक सोमवारी अतिरिक्त पोलीस आयुक्त श्रीकांत तरवडे यांच्या उपस्थितीत घेण्यात आली़. लक्ष्मी रोडवरुन मुख्य मिरवणुक सकाळी साडेदहा वाजता सुरु होते़. त्यात पहिल्या ५ मानाच्या गणपतीनंतर इतर मंडळांना सोडण्यात येते़. लक्ष्मी रोडवरुन जाणाऱ्या अनेक मंडळांनी मानाचे गणपती व त्यानंतर शेवटचे गणपती हेच मिरवणुकीतील बहुतांश वेळ घेत असल्याने आमची सव्वाशे वर्षे जुनी गणेश मंडळे असूनही दुसऱ्या दिवशी आम्हाला मिरवणुकीत सहभागी व्हावे लागते, अशी तक्रार केली़. याबाबत सहकार तरुण मंडळाचे अध्यक्ष भाऊ करपे यांनी सांगितले की, या बैठकीत मानाच्या गणपतींनी अगोदर मिरवणुक सुरु करावी, म्हणजे मिरवणुक लवकर संपेल व सर्वांना सहभागी होण्यास उशीर होणार नाही़. त्यांनी लवकर सुरुवात केली तर त्यांच्या मागाहून जाऊ़ जर मानाचे गणपती लवकर मिरवणुक सुरुवात करणार नसतील तर त्यांच्या अगोदर आम्हाला सकाळी ७ वाजता मिरवणुक काढण्यास परवानगी द्यावी, अशी आम्ही काही मंडळांनी मागणी केली़ तसा अर्ज गणेश पेठ पांगुळअळी ट्रस्टने केला आहे़. त्याला शंभर ते सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या अनेक मंडळांनी पाठिंबा दर्शविला आहे़. पोलिसांनी अशी परवानगी दिली तर आम्ही लवकर मिरवणुक काढू असे सांगितले आहे़. या बैठकीत राजेंद्र कोंढरे, विकास ढमाले, शैलेश बडाई, विजय मारटकर, संजय बालगुडे यांच्यासह अनेकांनी पाठिंबा दर्शविला आहे़. सकाळी लवकर मिरवणुक सुरु करण्यास लक्ष्मी रोडने जाणाऱ्या २२ मंडळाने तयारी दर्शविली आहे़. यावर पोलिसांनी मानाच्या गणपती मंडळांशी याबाबत बोलून योग्य तो निर्णय घेऊ, असे सांगितले़. पहिल्या पाच मानाच्या गणपतीच्या पदाधिकाऱ्याची रात्री उशिरा बैठक होणार असून त्यात ते भूमिका ठरविणार आहेत़ .
...तर आम्हाला सकाळी ७ ला विसर्जन मिरवणुकीला परवानगी द्या : गणेश मंडळांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2019 1:30 PM
मानाचे गणपती व त्यानंतर शेवटचे गणपती हेच मिरवणुकीतील बहुतांश वेळ घेत असल्याने आमची सव्वाशे वर्षे जुनी गणेश मंडळे असूनही दुसऱ्या दिवशी आम्हाला मिरवणुकीत सहभागी व्हावे लागते..
ठळक मुद्देपहिल्या पाच मानाच्या गणपतीच्या पदाधिकाऱ्याची रात्री उशिरा बैठक होणारसकाळी लवकर मिरवणुक सुरु करण्यास लक्ष्मी रोडने जाणाऱ्या २२ मंडळाने तयारी