लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : “कोरोनाची पार्श्वभूमी असतानाही राज्यात विविध राजकीय पक्षांचे मेळावे, शेतकरी आंदोलने, ग्रामपंचायत निवडणुका होत आहेत. त्याच्या गर्दीवर कोणतेही बंधन नाही. मग महाराष्ट्राचेच नव्हे, तर देशाचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यावर इतकी बंधने कशासाठी,” असा प्रश्न शेतकरी मराठा महासंघाने उपस्थित केला आहे.
शिवजयंती साजरी करण्यातील अटी शिथिल कराव्यात, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवजयंती साजरी करू, असा इशारा महासंघाचे अध्यक्ष संभाजी दहातोंडे यांनी सोमवारी (दि. १५) पत्रकार परिषदेत दिला. मनोहर वाडेकर या वेळी उपस्थित होते.
दहातोंडे म्हणाले, “यंदा शिवजयंती साजरी करण्यात राज्य सरकारने अनेक अटी घातल्या आहेत. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे. केवळ शंभर लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी, प्रभात फेरी, बाईक रॅली, मिरवणूक, अभिवादन सभा, पोवाडे, व्याख्याने, नाटके, सांस्कृतिक कार्यक्रम घेऊ नयेत, शिवनेरी, रायगड तसेच अन्य कोणत्याही किल्ल्यांवर जाऊ नये आदी अटी घातल्या आहेत. या अटी अयोग्य आहेत.”
प्रत्येक शिवप्रेमी नियमांचे पालन करून शिवजयंती साजरी करेल. त्यामुळे सरकारने ताबडतोब या अनावश्यक अटी रद्द करून उत्साहात शिवजयंती साजरी करू द्यावी. या अटी रद्द न केल्यास राज्यभरातील शिवप्रेमी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या सरकारी निवासस्थानी जाऊन शिवजयंती साजरी करतील, असे ते म्हणाले.