पुणे : शहरातील विविध विषयांवर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बाेलावलेल्या आमदार व महापालिका अधिकाऱ्यांच्या बैठकीत भाजपचे पदाधिकारी गणेश बीडकरच अधिक बोलत होते. हे कारण देत आमदार रवींद्र धंगेकर यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.
यानंतर पत्रकारांशी बोलताना धंगेकर म्हणाले, आजच्या बैठकीत चंद्रकांत पाटील यांनी माझ्याकडे पाहिलेदेखील नाही. ते अजूनही माझ्यावर नाराज दिसले. साेमवारच्या बैठकीत आमदारांना निमंत्रण होते, तरीही भाजपचे पदाधिकारीदेखील बैठकीला उपस्थित होते. पदाधिकाऱ्यांचीच बैठक घ्यायची होती तर आम्हाला का बोलावले. गणेश बीडकर बैठकीत अधिकाऱ्यांना प्रश्न विचारत होते.
याबाबत चंद्रकांत पाटील यांना विचारले असता, आमदार रवींद्र धंगेकर यांना मी पोहे खायला सांगितले; पण काहीही न बोलता ते बैठकीतून निघून गेले. या बैठकीला आमदारांना बोलावले होते; पण गणेश बीडकर त्यांच्या कामानिमित्त आले आणि ते झाल्यावर गेलेही. एवढ्या मोठ्या बैठकीत मी लक्ष दिले नाही म्हणून ते नाराज झाले हे मला आता कळले. ‘रात गई बात गई.’ धंगेकर यांनी मला जेवायला बोलावलं तर जाईन, असेही पाटील म्हणाले.