पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार अमोल कोल्हे यांनी नवीन कार घेतली आहे. आपली जुनी गाडी 6 ते 7 वर्षे वापरली असून 1.5 लाख किमीचे अंतर पार केल्यानंतर त्यांनी नवीन कार घ्यायचा निर्णय घेतला. मात्र, कोणत्या कंपनीची कार घ्यायची हा मोठा प्रश्न इतरांप्रमाणे त्यांच्याही समोर उभा होता. अनेकांना त्यांना राजकीय व्यक्तीमत्त्वाला शोभेल अशी, फॉरेन ब्रँड कंपनीची गाडी खरेदी करण्याचा सल्ला दिला. मात्र, कोल्हेंनी ऐकावे जनाचे, करावे मनाचे हेच करुन दाखवलं.
खासदार कोल्हे यांनी टाटा मोटार्स कंपनीची टाटा हैरियर ही कार खरेदी केली आहे. ही कार खरेदी करण्यामागचं कारणही त्यांनी एका व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलंय. कोविड 19 महामारीच्या काळात देशातील एका मोठ्या उद्योग समुहाने देशासाठी हजारो कोटी रुपयांची मदत दिली. नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा हा उद्योग समूह कोविड काळातही प्रकर्षाने उठून दिसला, तो उद्योग समूह म्हणजे अर्थात टाटा ग्रुप. त्यामुळेच मी टाटा हैरियर ही कार खरेदी केली. त्यासोबच, माझ्या वैयक्तिक जीवनातही टाटा ग्रुपचा मोठा वाटा राहिला आहे, त्यामुळेच मी टाटा कंपनीचा कार खरेदी केल्याचं कोल्हेंनी सांगितलं.
रतन टाटा स्कॉलरशीपचा माझ्या शैक्षणिक प्रवासात मोठा वाटा राहिला आहे. टाटा उद्योग समूह देशहितासाठी, सामाजिक उत्तरदायित्व निभावण्यासाठी सातत्याने अग्रभागी असतो. त्यामुळेच, या उद्योग समुहाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी टाटा हैरियर ही कार खरेदी केली. रतन टाटा हे देशाची प्रेरणा आहेत, देशातील प्रत्येक नागरिकाची ते प्रेरणा आहेत, देशाला आपला अभिमान आहे, असेही कोल्हे यांनी म्हटले. मला अभिमान आहे, टाटा ग्रुपचा ज्यांनी वर्ल्ड क्लास प्रोडक्ट बनवला. त्या वर्ल्ड क्लास प्रोडक्टचा मी ग्राहक बनलोय. मी आज लोकलचा व्होकल झालोय, असेही त्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं.