पुणे : स्मशानभूमीत गेल्यानंतर घुबड दिसले तर मृत्यू होतो किंवा अघटित घडते, असा आपल्याकडे समज आहे. मात्र त्यात तथ्य नाही. स्मशानभूमीच्या आजूबाजूची मोठी झाडे तोडली गेली; मात्र स्मशानभूमीतील जुनी झाडे काेणी ताेडू शकले नाही. त्यामुळे जुनी झाडे टिकली आणि तिथे घुबडांनी आश्रय घेतला. त्याचा मृत्यू किंवा भुतांशी कसलाही संबंध नाही, असे घुबड सर्वेक्षणाचे प्रमुख आणि इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले.
घुबडांचा भुतांशीही संबंध जोडला जाण्याच्या गोष्टींचा छडा लावण्यासाठी केलेल्या घुबडांच्या सर्वेक्षणातून ही बाब आढळून आली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पर्यावरण विज्ञान विभाग, केईएम रुग्णालय आणि इला फाउंडेशन यांच्यातर्फे हे संशोधन करण्यात आले आहे.
या उपक्रमात पुणे जिल्ह्यातील सुमारे ५७ स्मशानभूमीत २०१९ मध्ये घुबडांबाबत सर्वेक्षण करण्यात आले. त्यामध्ये ४८ हिंदूंच्या स्मशानभूमी, मुस्लीम ७ आणि ख्रिश्चन समाजाच्या दोन होत्या. या ठिकाणांना तीन वेळा भेट देऊन हे सर्वेक्षण केले. यात इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे, राजूरकर सुधन्वा, राहुल लोणकर, आविष्कार भुजबळ, मदने पांडुरंग यांचा सहभाग होता.
सर्वेक्षणात आढळली २०० घुबड
स्मशानभूमीत स्पाॅटेड आऊल १४४, मोटलेड वूड आऊल ८, बर्न आऊल ३०, इंडियन इगल आऊल १३, ब्राऊन वूड आऊल २ आणि जंगल आऊल २ या घुबडांची नोंद झाली. जुन्या पिंपळ, वड, करंज, कडुनिंब, शिरीष वृक्षांवर या घुबडांनी घरटं तयार केल्याचे दिसले.
अंधश्रद्धा दूर करण्याचा प्रयत्न
लोकांमध्ये आजही घुबडांबाबत अंधश्रद्धा आहे. स्मशानभूमीत गेल्यावर तिथे खूप झाडं असतात. ती जुनी झाडे असल्याने त्या ठिकाणी घुबडं आपलं घर करतात. ती घुबडं पाहून लोकं त्याचा संबंध मृत्यूशी किंवा भुतांशी जोडतात. जो योग्य नाही. मुळात स्मशानभूमीच्या आजूबाजूला जी जुनी झाडं होती, ती नष्ट झाली आणि म्हणून घुबडांना स्मशानभूमीत आश्रय घ्यावा लागत आहे. आधुनिक जगात राहत असलो तरी आजही ४० टक्के लोकांमध्ये घुबडांबाबत अज्ञान आहे. ते घुबडांना भुतांशी जोडतात. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी सातत्याने जनजागृती केली पाहिजे. त्यासाठीच हा सर्व्हे २०१९ मध्ये सहा महिने करण्यात आला. घुबड हा इतर पक्ष्यांप्रमाणेच आहे, असेही इला फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सतीश पांडे यांनी सांगितले.