पुणे : पोस्ट मागील हेतू साध्य व्हायचा असेल तर तुमच्या पोस्ट या कमी शब्दात व टोकदार असायला हव्यात असा कानमंत्र अमित शहा यांनी भाजपच्या सोशल मिडियाच्या स्वयंसेवकांना दिला. आज (रविवार) अमित शहा यांनी बालगंधर्व येथे राज्यभरातून आलेल्या भाजपच्या सोशल मिडिया स्वयंसेवकांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्तिथ होते. अमित शहा आज पुणे भेटीवर असून दुपारी त्यांनी विठ्ठल मंदिरात जाऊन ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा पादुकांचे दर्शन घेतले.
यावेळी स्वयंसेवकांशी बोलताना शहा म्हणाले, पुढच्या निवडणूकचा प्रचार हा सोशल मिडिया च्या माध्यमातून होणार आहे. त्यामुळे त्याची तयारी करताना आपण जी पोस्ट टाकतोय ती कश्यासाठी टाकतोय, त्यात काय लिहितोय, ती कशी लिहितोय या कडे लक्ष देणे आवश्यक आहे. आपली पोस्ट ही टोकदार असायला हवी. त्याचा परिणाम लोकांवर व्हायला हवा. माध्यमाचा वापर करणारी प्रशिक्षित फोज आपल्याकडे तयार पाहिजे. फक्त मला वापरता येते असे करून चालणार नाही. कशासाठी वापर करायचा हे पक्के माहिती पाहिजे. ते माहिती नसेल तर मग त्याचा उपयोग होणार नाही.
मुख्यमंत्र्यांनीही सोशल मिडियाचे महत्व विशद केले. मला हे जमत नाही, येत नाही असे म्हणून चालणार नाही ते शिकून घ्यावेच लागेल असे ते म्हणाले. महापौर मुक्ता टिळक, खासदार अनिल शिरोळे, शहराध्यक्ष योगेश गोगावले, सभाग्रुह नेते श्रीनाथ भिमाले स्थानिक नगरसेवक निलिमा खाडे, सिद्धार्थ शिरोळै आदी यावेळी उपस्थित होते